Join us

चरस तस्करीप्रकरणी आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नववर्षाच्या पार्टीसाठी दिल्लीहून आणलेल्या १२० कोटी किमतीच्या ३४ किलो चरस तस्करी प्रकरणात हिमाचल कनेक्शन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नववर्षाच्या पार्टीसाठी दिल्लीहून आणलेल्या १२० कोटी किमतीच्या ३४ किलो चरस तस्करी प्रकरणात हिमाचल कनेक्शन उघड होताच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासाबरोबर जालना, बीड, चंद्रपूर, नागपूर, पुणे, धुळे या जिल्ह्यांत गांजाच्या संबंधित दाखल १२ गुन्ह्यांचा तपास मंगळवारी एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार एटीएसकडून ड्रग्जची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरुवात झाली आहे.

पुण्याच्या लोहमार्ग पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला ३४ किलो चरस जप्त करत, ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९) आणि कौलसिंग रूपसिंग ऊर्फ भारद्वाज (४०) यांना अटक केली. हिमाचल प्रदेशातून दिल्लीमार्गे पुण्यासह मुंबई, गोवा, नागपूर, बंगळुरू या शहरांतील पब, हॉटेलमध्ये हा चरस विकला जाणार होता. पुढील चौकशीसाठी हा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएसचे पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक हिमाचल प्रदेश येथे रवाना झाले. तसेच बंगळुरू, गोवा या ठिकाणी देखील तपास पथक पाठविण्यात आले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांची छापेमारी केली. अशात ३१ डिसेंबर रोजी विवेककुमार सिंग (३५) आणि सूरज शेलार (३९) यांना अटक करून ५६४ ग्रॅम चरस जप्त केला. त्यांच्या चौकशीत सिंगने ललितकुमारकडून दोन किलो चरस विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाच्या तपासाबरोबर जालना, बीड, चंद्रपूर, नागपूर, पुणे, धुळे, या जिल्ह्यांत गांजा संबंधित दाखल १२ गुन्ह्यांचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे.