Join us

पूर्व, पश्चिम उपनगरात आणखी दोन रुग्णालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 1:40 PM

बेडची संख्या दोन हजारांनी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोविडनंतर आता उपनगरीय रुग्णालये सक्षम करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. पालिकेच्या सध्याच्या एकूण १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी आठ रुग्णालयांचा पुनर्विकास, विस्तारिकरण करण्याची कामे वेगाने सुरु आहेत. त्यासोबत दोन नवीन उपनगरीय रुग्णालयेही आकाराला येत आहेत. यामुळे उपनगरीय रुग्णालय सेवेतील खाटांची संख्या दोन हजारांनी वाढणार आहे.

कोविड कालावधीनंतर उपनगरांमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना प्रमुख आरोग्य सेवा त्यांच्या नजीकच्या परिसरात मिळाव्यात या उद्देशाने उपनगरीय रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचा पालिकेचा मानस आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयांची कामे पूर्ण झाल्यानंतर, त्यांची सध्याची बेडची क्षमता १ हजार ४०५ ने वाढून एकूण ३ हजार ९६४ इतकी होईल. म्हणजेच नवीन २ हजार ५५९ बेडची भर पडणार आहे. म्हणजेच सर्व उपनगरीय रुग्णालयांची मिळून एकूण बेडची क्षमता ही ६ हजार १४३ इतकी होणार आहे.मनुष्यबळासह सेवाही वाढणार

उपनगरीय रूग्णालयात सध्या ६ हजार ७९० कर्मचारी आहेत. त्यामध्ये सुमारे ५ हजार ५०० इतक्या नव्या कर्मचाऱ्यांची भर पडून ही संख्या १२ हजार ९९० इतकी होईल. उपनगरीय रुग्णालयांमधून देण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी रूग्णशय्येअंतर्गत कार्डिओलॉजी, कार्डिओ व्हॅस्कुलर थोरॅसिक सर्जरी, गॅस्ट्रो - एन्टेरोलॉजी मेडिसीन ॲन्ड सर्जरी, नेफ्रॉलॉजी, डायलेसिस, युरोसर्जरी, हेमॅटोलॉजी ॲन्ड हेमॅटो ऑन्कॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बर्न्स, रेडिओथेरपी, केमोथेरपी, ऑन्कोसर्जरी, पॅडिएट्रिक सर्जरी, एन्डोक्रिनोलीसाठी बेड असतील.

अतिदक्षता विभाग अन् माॅड्युलर ओटी

उपनगरीय रुग्णालयांमध्ये आयसीयू, एनआयसीयू आणि आयपीसीयू बेडची संख्या सध्या २४९ इतकी आहे. यात ४५६ इतकी भर पडत ही संख्या ७०५ इतकी होईल. शस्त्रक्रिया विभाग आणि मॉड्युलर शस्त्रक्रिया विभाग अंतर्गत सध्या एकूण ८९ कक्ष आहेत. यामध्ये १३१ कक्षांची भर पडतानाच ही संख्या आगामी कालावधीत २१२ वर पोहोचेल.

टॅग्स :मुंबई