डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर आज मुंबईत आणखी दोन रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 10 वर गेला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या जोहांसबर्गयेथून 25 नोव्हेंबरला 37 वर्षीय व्यक्ती मुंबईत आला होता. त्याला पहिल्यांदा ओमायक्रॉनची लागण झाली आहे. यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या अमेरिकेहून आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मैत्रिणीला देखील ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे.
महत्वाचे म्हणजे या दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. दोघांनाही सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांनी फायझर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 5 जणांता तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या 315 जणांचा शोध घेण्यात आला आहे. काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी सात रुग्ण सापडले होते. यामुळे खळबळ उडाली होती.
राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.