नवी मुंबई :
समर अर्थात उन्हाळी सुटीसाठी कोकण रेल्वेने आपल्या विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडल्या आहेत. या गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन आता यात आणखी दोन गाड्यांची भर टाकण्यात आली आहे. यापूर्वी खास उन्हाळी सुटीसाठी चार विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत, तर प्रवाशांच्या मागणीनुसार काही मार्गांवर विशेष साप्ताहिक आणि ‘वन वे’ गाडी सोडण्यात आली आहे.
नव्या समर स्पेशल गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी (०१४५५/०१४५६) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ एप्रिल ते ३ जून २०२३ या कालावधीत दर शनिवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी २ वाजून ३५ मिनिटांनी करमाळी स्थानकात पोहोचेल. करमाळा येथून लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर धावताना ही गाडी दिनांक १५ एप्रिल ते ३ जून या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी ४:२० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
पुणे ते एर्नाकुलम ही दुसरी सुपरफास्ट (०१४४९/०१४५०) गाडी १३ एप्रिल ते २५ मे २०२३ या कालावधीत आठवड्यातून एकदा धावेल. ही गाडी पुणे येथून दर गुरुवारी सायंकाळी ६:४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ती सायंकाळी ६:५० वाजता एर्नाकुलमला पोहोचेल.
येथे थांबेल पुणे ते एर्नाकुलम गाडीही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कन्नूर, थलास्सेरी, कोझिकोडे, तिरूर, शोरनूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.