आणखी दोन महिला ताब्यात
By admin | Published: September 23, 2015 12:40 AM2015-09-23T00:40:41+5:302015-09-23T00:40:41+5:30
पानसरे हत्या प्रकरण : दोघीही कर्नाटकातील; कर्नाटक सीआयडीकडून समीरची कसून चौकशी
आणखी दोन महिला ताब्यात
पानसरे हत्या प्रकरण : दोघीही कर्नाटकातील; कर्नाटक सीआयडीकडून समीरची कसून चौकशी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात समीर गायकवाडला कटासाठी मदत केल्याच्या संशयावरून कर्नाटकातील दोन महिलांना कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. त्या महिलांचीही पोलीस अधीक्षक कार्यालयात कसून चौकशी करण्याचे काम दिवसभर सुरू होते. या चौकशीत अनेक बाबी उघडकीस आल्याचे समजते.
दरम्यान, समीर गायकवाड हा राहत असलेल्या ठाण्यातील एका खोलीवर कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून दोन बॅगा भरून साहित्य जप्त केले आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरमध्ये समीर गायकवाड याच्यासह मडगाव बॉम्बस्फोटातील मास्टर मार्इंड रूद्र पाटील, सारंग अकोळकर-कुलकर्णी यांनी रचल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
या हत्येचे कनेक्शन संकेश्वर-खानापूर, गोवा, मडगाव असे असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी संकेश्वर भागात तळ ठोकून ही माहिती तपासात उघडकीस आणली. पानसरे यांच्या हत्येनंतर एटीएसच्या पथकाने केलेल्या तपासात ही माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.
त्याच्याआधारे बंगलोर सीआयडीचे पोलीस उपाधीक्षक डॉ. चंद्रशेखर यांनी कोल्हापुरात येऊन प्रथम पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याच्याकडे सुमारे अर्धा तास चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजता बंगलोर येथील सीआयडीचे अधीक्षक डॉ. राजाप्पा कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी प्रथम अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. एस. चैतन्या यांची भेट घेऊन समीर गायकवाड याच्याबाबत सुमारे अर्धा तास चौकशी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांंच्याशी चर्चा करून त्यांनी थेट समीर गायकवाड याची भेट घेतली. धारवाड येथे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांना तपासकामात मिळालेले धागेदोरे आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येबाबत संकेश्वर येथे रचलेला कट यासंदर्भात समीर गायकवाडवर बंद खोलीत सुमारे तीन तास प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पण त्याने चौकशीत अनेक बाबींचा अधीक्षक डॉ. राजाप्पा यांच्याकडे इन्कार केल्याचे समजते. या चौकशीवेळी अधीक्षक डॉ. राजाप्पा यांनी आपल्या सहकाऱ्यांकरवी समीरने दिलेल्या माहितीचा शब्द न शब्द लेखी स्वरुपात कागदावर उतरविला, तर त्याने सांगितलेली माहितीही रेकॉर्डिंग केल्याचेही समजते. चौकशीनंतर अधीक्षक डॉ. राजाप्पा यांच्याकडे पत्रकारांनी चौकशी केली असता त्यांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला. यावेळी त्यांच्यासोबत बंगलोर सीआयडीचे उपअधीक्षक चंद्रशेखर हेही उपस्थित होते.
गुजरातचे फॉरेन्सिक लॅबचे पथक कोल्हापुरात
पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेला समीर गायकवाड हा तपासकामात पोलिसांना अपेक्षित सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याचे मोबाईल कॉलचे व्हाईस रेकॉर्डिंग आदी बाबी तपासण्यासाठी गुजरात येथील गांधीनगर फॉरेन्सिक लॅबचे तीन सदस्यांचे पथक मंगळवारी दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या पथकामार्फत समीरचे व्हाईस रेकॉर्डिंगची तपासणी करण्यात येणार आहे तसेच त्याच्याकडून झालेल्या सर्व कॉलची तपासणीही करण्यात येणार आहे, समीरचे वर्तन, संभाषण हेही तपासण्यात येणार आहे.