पनवेल : मोहरमची सुट्टी असल्याने मुंबईतील एका कॉलेजचा ग्रुप खारघरमधील ओवे कॅम्प या ठिकाणी सहलीसाठी आला होता. तलावात पोहण्यासाठी दोघे जण उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. राम किशन जैस्वाल (१७, रा. घाटकोपर) व कुलदीप पांडे (१५, रा. अँटॉप हिल) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. परिसराची काहीच माहिती नसतानाही सर्व तरु ण ओवे कॅम्पजवळील तलावात पोहण्यास उतरले. मात्र, दुपारी दोघे बुडाल्याची माहिती मिळाली. खारघर पोलिसांकडे या मुलांच्या पालकांनी धाव घेतल्यानंतर, रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी तलावात शोधमोहीम सुरू केली, पण काहीच हाती लागले नाही. गुरुवारी सकाळी दोघांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
मुंबईचे दोघे खारघरमध्ये बुडाले
By admin | Published: October 14, 2016 3:02 AM