बेस्ट प्रवाशांसाठी दोन नवीन वातानुकूलित बससेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 08:56 PM2021-10-30T20:56:23+5:302021-10-30T20:57:20+5:30
१ नोव्हेंबरपासून दोन नवीन वातानुकूलित बस मार्ग सुरू करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मागील काही दिवसांमध्ये बेस्ट उपक्रमाने बस मार्गांमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार काही ठिकाणी नवीन बस मार्गही वाढवण्यात आले आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून दोन नवीन वातानुकूलित बस मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भाऊचा धक्का अशा वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात येणार आहेत.
बेस्ट उपक्रमामार्फत दररोज सरासरी २७ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट प्रवासी संख्या आणखी वाढवण्यासाठी काही नवीन बसमार्ग सुरू केले आहेत. मागील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विविध भागात वातानुकूलित बससेवा बेस्ट उपक्रमाने सुरू केल्या आहेत. त्यानंतर आता ठाणे येथील कॅडबरी जंक्शन पूर्वकरिता नवीन वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, भाऊचा धक्का येथून अलिबाग - मांडवा येथे समुद्रमार्गे जाण्याकरिता रो रो बोट सेवा सुरू करण्यात आली आहे. येथे पोहोचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून भाऊचा धक्कापर्यंत ए ४१ इलेक्ट्रिक वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
बस फेऱ्यांची वेळ....
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ : सकाळी ७.३०, ८.३०, ९.३०, संध्या. ५, ६, ७.
कॅडबरी जंक्शन येथून सकाळी ६, ७, ८.
प्रवासी भाडे ५० रुपये ते १२५ रुपये.
भाऊचा धक्का येथे जाण्यासाठी... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली बस सकाळी ६.३० वाजता तर शेवटची बस ९.३० वाजता.. भाऊचा धक्का येथून ६.५० ते रात्री १० वाजेपर्यंत.