पश्चिम रेल्वेवर धावल्या दोन नव्या ‘लेडीज स्पेशल’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:59 AM2018-12-26T06:59:08+5:302018-12-26T06:59:29+5:30

नाताळच्या दिवशी पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांना दोन नव्या ‘लेडीज स्पेशल’ गाड्यांची भेट देण्यात आली आहे.

 Two new Ladies Specials run on Western Railway | पश्चिम रेल्वेवर धावल्या दोन नव्या ‘लेडीज स्पेशल’

पश्चिम रेल्वेवर धावल्या दोन नव्या ‘लेडीज स्पेशल’

Next

मुंबई : नाताळच्या दिवशी पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांना दोन नव्या ‘लेडीज स्पेशल’ गाड्यांची भेट देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या महिला लोकलची संख्या आता १० झाली आहे. मंगळवारी या दोन महिला विशेष गाड्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावू लागल्या. पहिली नवीन लोकल फेरी सकाळी ९ वाजून ०६ मिनिटांनी भार्इंदरवरून सुटली आणि सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी चर्चगेट स्थानकावर पोहोचली. दुसरी नवीन लोकल फेरी सकाळी १० वाजून ०४ मिनिटांची वसई रोड स्थानकावरून सुटली. ती सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी चर्चगेटला पोहोचली.
खासगी आणि सरकारी तसेच इतर ठिकाणी काम करणाºया महिला प्रवाशांना या लोकलचा फायदा होणार असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.

रेल्वे बोर्डाकडून रिटर्न गिफ्ट, एसी लोकलचे भाडेवाढीच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती
पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. एसी लोकलने वर्षपूर्ती केल्याने रेल्वे बोर्डाने तिकीट दरवाढीच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे लोकलच्या तिकीट पासधारक प्रवाशांना आणखी चार महिने सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रवाशांना २४ एप्रिल, २०१९ पर्यंत सवलतीच्या दरांमध्ये एसी लोकलने प्रवास करता येणार आहे.
एसी लोकलला जादा प्रवाशांनी लाभ घेण्यासाठी प्रथम श्रेणीच्या एसी लोकलच्या तिकीट दरांच्या १.३ पटऐवजी १.२ पट भाडे आकारण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. दर सहा महिन्यांनी एसी लोकलच्या भाडेदराची रचना करण्यात येणार होती. मात्र, भाडेदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. भाडेदरात कोणताही बदल न करण्याची ही तिसरी वेळ आहे.

नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई

विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल मंगळवारपासून पुन्हा भार्इंदर स्थानकातून सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे व्यवस्थापनाने घेतला. यामुळे मीरा-भार्इंदर महिला प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र महिला विशेष लोकल सुरू झाल्यावरून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

प्रवास कमी त्रासदायक
लेडीज स्पेशल लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण कमी असल्याने आरामदायी आणि सोईस्कररीत्या प्रवास करता येतो. लोकलचा प्रवास महिला विशेष गाडीमुळे कमी त्रासदायक झाला आहे.
- वनिता जाधव, प्रवासी
फायदा होणार
सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला लोकलमध्ये खूप गर्दी असते. लेडीज डब्यात उभे राहायला जागा नसते. मात्र आता दोन गाड्या वाढल्यामुळे सर्व महिला प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
- सुस्मिता सावंत, प्रवासी

गोरेगाव-राम मंदिर स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडाचा फटका
पश्चिम रेल्वेमार्गावरील गोरेगाव व राम मंदिर या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे जलद लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.
रेल्वे अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर व गोरेगाव या स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील रेल्वे रुळाला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान तडा गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. जलद मार्गावरील रेल्वे धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या. घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे इंजिनीअरिंग विभागाने रुळाची दुरुस्ती केली. त्यानंतरही काही काळ जलद मार्गावरील लोकल फेºया उशिराने धावत होत्या.

Web Title:  Two new Ladies Specials run on Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.