Join us

एकाच वेळी दोन पेपर

By admin | Published: September 23, 2014 12:12 AM

मागील दोन वर्षांपासून घरोघरी जाऊन नव्या-जुन्या मतदारांची माहिती गोळा करणा-या ठाणे महापालिकेच्या ९० टक्के शिक्षकांना लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीच्या कामालाही जुंपले आहे़

ठाणे : मागील दोन वर्षांपासून घरोघरी जाऊन नव्या-जुन्या मतदारांची माहिती गोळा करणा-या ठाणे महापालिकेच्या ९० टक्के शिक्षकांना लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीच्या कामालाही जुंपले आहे़ विशेष म्हणजे निवडणुकीच्या कालावधीतच विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानुसार, ताळमेळ साधून एकाच दिवशी विद्यार्थ्यांना दोन-दोन विषयांचे पेपर सोडवावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणांवरदेखील याचा परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.मागील दोन वर्षांपासून ठाणे महापालिकेतील सुमारे ९० टक्के शिक्षक बूथ लेव्हल आॅफिसरचे काम करीत असून घरोघरी जाऊन नवीन मतदारांची माहिती गोळा करणे, पत्ता बदलला असेल, नावात बदल असेल, अशा प्रकारची कामे करीत आहेत. त्यात एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे काम त्यांना करावे लागले होते. या काळात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत्या. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर झाला होता़लोकसभा निवडणूक संपून आता शाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी जात नाही तोच पुन्हा शिक्षकांना विधानसभा निवडणुकांचे काम करावे लागत आहे. महापालिकेच्या ९० टक्के शिक्षकांना या कामांच्या आॅर्डर आल्या असून यामध्ये मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. परंतु, १० आॅक्टोबरपासून विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू होणार असून १६ तारखेला शेवटचा पेपर आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत निवडणुकीचे अधिकचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. शिक्षकांच्या या व्यस्ततेचे भोग मात्र विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहेत. यापूर्वी सहामाही परीक्षेच्या वेळेस रोज एक पेपर विद्यार्थी सोडवत होते. परंतु, आता त्यांना एकाच दिवशी दोन पेपर सोडवावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणांवरदेखील याचा परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)