डोंगरी दुर्घटनेतील दोन रुग्णांना मिळणार नवे आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:39 AM2019-08-09T03:39:01+5:302019-08-09T03:39:15+5:30
जे.जे. रुग्णालयात लवकरच शस्त्रक्रिया; अलिमाबानोला सामान्य विभागात हलविणार
- स्नेहा मोरे
मुंबई : डोंगरी दुर्घटनेत इमारत कोसळून अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला, अनेकांचे संसार उघड्यावर आले. याच दुर्घटनेत आपल्या दोन चिमुरड्यांना गमावलेल्या अलिमाबानो मोहम्मद रशिद इद्रिसी (३५) या महिलेला लवकरच नवे आयुष्य मिळणार आहे. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर तिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करणार असून यामुळे त्या पुन्हा एकदा सामान्य जीवन जगू शकतील.
१६ जुलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेमुळे हा दिवस येथील रहिवाशांसाठी काळा दिवस ठरला. अनेकांनी निकटवर्तीयांना गमावले. त्यातलेच रशिद इद्रिसी यांचे कुटुंबीय. रशिद मूळचा लखनऊ येथील असून तो डोंगरीत कापडाच्या कारखान्यात काम करतो. लखनऊहून काही दिवसांच्या सुट्टीसाठी आलेल्या त्याच्या कुटुंबीयांचा काळाने घात केला आणि अवघ्या सात आणि आठ वर्षांच्या लहानग्यांना त्याला कायमचे गमवावे लागले. रशिदची पत्नी अलिमाबानो यात गंभीर जखमी झाली.
जे.जे. रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जरी विभागात लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत घरवाडे यांनी सांगितले की, तिच्या उजव्या हाताला मल्टीपल क्रश इंज्युरी झाल्या आहेत. शिवाय, तिच्या उजव्या पायाची हालचाल होत नाही. त्या पार्श्वभूमीवर तिच्यावर गेल्या महिन्यापासून उपचार सुरू होते. आता तिची प्रकृती स्थिर असून तिला अतिदक्षता कक्षातून लवकरच सामान्य विभागात हलविण्यात येईल. गेल्या आठवड्यापासून ती व्हीलचेअरवर फिरते आहे. तिच्या एमआरआय चाचणीचा अहवाल आल्यानंतर उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया जखम बरी करण्यासाठी करण्यात येईल. त्यानंतर आणखी काही शस्त्रक्रियांची गरज भासू शकते, त्यानंतर हाताच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
साजिदावरही प्लॅस्टिक सर्जरी
या दुर्घटनेतील साजिदा जरीवाला (५८) हिच्या डाव्या हाताला हाडाला फ्रॅक्चर व जखम झाली असून तिच्यावरही प्लॅस्टिक सर्जरी करण्यात येईल. तिच्या डाव्या पायालाही दुखापत झाली असून डोळ्यांसमोर अंधार येतो, त्यामुळे तिच्या काही वैद्यकीय चाचण्या करून त्यानंतर शस्त्रक्रियेचे नियोजन करू, अशी माहिती डॉ. घरवाडे यांनी दिली.
...अजून मदत मिळाली नाही
अजूनही नोकरीवर रुजू झालो नाही. कारण पत्नीवर उपचार सुरू आहेत. तिची काळजी घेण्यासाठी लखनऊहून तिची आई रुग्णालयात येऊन राहते. अजूनही ती मानसिक धक्क्यातून सावरली नाही. जखमी व मृत व्यक्तींसाठी जाहीर झालेली मदत मिळण्यासाठी कागदपत्रे कार्यालयात सादर केली आहेत. मात्र, अजूनही त्यावर कुणीही प्रतिसाद दिलेला नाही. मदत कधी मिळणार? याविषयी कुणीही उत्तर देत नाही, त्यामुळे चिंतेत आहे. - रशिद इद्रिसी, अलिमाबानो इद्रिसी यांचा पती.