गावात आलिशान घरे बांधण्यासाठी बनले ठग; व्यावसायिकांना घातला गंडा, दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:51 PM2024-04-01T17:51:02+5:302024-04-01T17:51:49+5:30
कुरिअर सेवा देण्याच्या बहाण्याने मासे निर्यात करणाऱ्या कंपनीच्या व्यावसायिकाला जाळ्यात ओढले.
मुंबई : राजस्थानमध्ये आलिशान घरे बांधण्यासाठी दोन चुलत भावांनी थेट अंगडिया बनून मुंबईतील व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचे एल. टी. मार्ग पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भगाराम सारस्वत (२४) आणि काळुराम भगीरथ शर्मा (२२) या भावांना बेड्या ठोकल्या आहेत.
कुरिअर सेवा देण्याच्या बहाण्याने मासे निर्यात करणाऱ्या कंपनीच्या व्यावसायिकाला जाळ्यात ओढले. त्याने एक कोटीची रक्कम सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी आरोपींना दिली. मात्र, ती न पाठवताच त्यांची फसवणूक केली. ते पसार झाल्याने दोघांविरोधात १ मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. ते कोलकाता येथे असल्याचे समजले. तसेच एक संशयित अहमदाबाद येथे असल्याचे समजताच तेथे पथक पाठवले. त्यावेळी अहमदाबादला १८ मार्चला काळुराम त्यांच्या हाती लागला.
काळुरामच्या चौकशीतून भावंडांचा प्रताप उघडकीस आला. बिकानेरमधून सारस्वत यालाही अटक करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी बिकानेरच्या तेजसर गावात राहत होते. दोघांनी त्यांच्या गावात घरे बांधण्याचे स्वप्न रंगवले होते. अन्य दोन आरोपी पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीने अनेकांना गंडविल्याचा संशय असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.