Join us

उल्हासनगर, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 11:13 AM

विठ्ठलवाडी स्टेशनला रुग्णवाहिका, व्हीलचेअर, रेल्वे अधिकारी आणि पोलिस उपस्थित नसल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. 

उल्हासनगर : उल्हासनगर व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ लोकलमधून पडून तरुण व तरुणी गंभीर जखमी झाले. तरुणीला कल्याण तर तरुणाला मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असून रेल्वे प्रशासनाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.

शहरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनपासूनजवळ असेलेली एफ कँबिन वालधुनीजवळ मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान एक तरुणी अंबरनाथ लोकलमधून पडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उचलून नेण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनमध्ये कोणीही उपलब्ध नव्हते. मुलगी आपल्या जिवाची धडपड करीत असल्याचे चित्र होते. 

अखेर शिवसैनिकांनी तसेच दिनेश धुमाळ व विशाल रोखडे या तरुणाने मुलीला उचलून रिक्षातून कल्याण येथील रुग्णालयात हलविले असून मुलीची तब्येत चांगली असल्याची माहिती शिवसेना विभाग प्रमुख दीपक साळवे यांनी दिली. तसेच मुलीचे नाव कळू शकली नाही, असे ते म्हणाले. विठ्ठलवाडी स्टेशनला रुग्णवाहिका, व्हीलचेअर, रेल्वे अधिकारी आणि पोलिस उपस्थित नसल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. 

दुसरी घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी 10 वाजता घडली. मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमधून गायकवाड नावाचा मुलगा पडून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वन रुपीज क्लिनिकमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. असे प्रकार लोकलमधील गर्दीमुळे होत असल्याची प्रतिक्रिया चाकरमान्यांनी देऊन लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली. 

टॅग्स :मुंबई लोकल