नवी मुंबई : संयुक्त शाळा उभारण्यासाठी सिडकोने महापालिकेला दोन भूखंड हस्तांतरित केले आहेत. सीबीडी बेलापूर व कोपरखैरणे येथे हे भूखंड आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी यासाठी काही भूखंडांचे वाटप महापालिकेस मोफत करण्यात यावे या धोरणांतर्गत सिडकोने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे दोन भूखंड महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. सीबीडी बेलापूर येथील सेक्टर-२३ मधील भूखंड क्र. ११ हा अंदाजे ४०० चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड तसेच कोपरखैरणे येथील सेक्टर-२३ मधील भूखंड क्र. २० ए हा अंदाजे ३५०० चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड अतिशय नाममात्र भाडेपट्टीवर महापालिकेला देण्यात आले आहेत. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या या धोरणास राज्य सरकारने ९ सप्टेंबर २०१४ रोजी पत्राद्वारे मान्यता दिली. त्यानुसार भूखंड महापालिकेस दरवर्षी सुमारे रुपये १००० प्रमाणे नाममात्र भाडेपट्ट्यावर ६० वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या दोन्ही भूखंडांवरील बांधकामास १.० चटईक्षेत्र निर्देशांक दिला आहे. निश्चित केलेल्या कालावधीत बांधकाम पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. सरकारची मान्यता प्राप्त झाल्यामुळे आता या भूखंडांनंतर नवी मुंबईतील इतर ४ नोड्समधील भूखंडाचेही वाटप याच धर्तीवर महापालिकेस कंपोझिट स्कूल व ज्युनियर कॉलेज उभारणीसाठी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सिडकोचे महापालिकेला दोन भूखंड
By admin | Published: July 01, 2015 12:04 AM