मुंबई : कोरोनामुळे गेल्या १२ तासांत मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील मृत पोलिसांचा आकड़ा ६० वर गेला आहे. तर राज्यभरात कोरोनामुळे तब्बल १३३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
मुलुंड पोलीस ठाण्यातील ५४ वर्षीय पोलीस निरिक्षकासह देवनार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षकाचा यात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलुंड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापाठोपाठ गुरूवारी पोलीस निरीक्षकाच्या मृत्यूने सर्वानाच धक्का बसला आहे.
मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक कर्तव्यावर असताना ताप आल्याने त्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७ ऑगस्ट पासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. तेथेच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यापाठोपाठ देवनार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक यांच्यावर ९ ऑगस्ट पासून नेरुळच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. गुरूवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मुळचे पुणे येथील रहिवासी असलेले पोलीस उपनिरिक्षक नवी मुंबईत पत्नी, एक मुलगा व एक मुलगी सोबत राहण्यास होते. दोघांच्या मृत्यूने मुंबई पोलीस दल पुन्हा एकदा हादरले आहेत.
राज्यभरात २४ तासांत ११७ पोलिसांना बाधा : राज्यभरात कोरोनामुळे १३३ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत ११७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. सदयस्थितीत राज्यभरात ३०४ अधिकाऱ्यांसह एकूण २ हजार २६६ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.