Join us  

दोन पोलिसांसह एक पोलीस पत्नी निवडणूक रिंगणात

By admin | Published: February 05, 2017 4:22 AM

आॅन ड्युटी २४ तास असलेल्या पोलिसांच्या समस्यांकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष होत आले. पोलीस कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस पत्नीने उपोषणाचा मार्ग निवडला.

मुंबई : आॅन ड्युटी २४ तास असलेल्या पोलिसांच्या समस्यांकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष होत आले. पोलीस कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस पत्नीने उपोषणाचा मार्ग निवडला. यातच स्थानिक पातळीवर का होईना त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत दोन पोलिसांसह एक पोलीस पत्नी नगरसेवकाच्या शर्यतीत उतरल्या आहेत. यामध्ये घाटकोपर, चेंबूर आणि अंधेरीतील प्रभागांचा समावेश आहे.पोलिसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या अध्यक्षा यशश्री प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण सुरू करण्यात आले होते. स्थानिक पातळीवर का होईन या समस्या मार्गी लावण्यासाठी पाटील यांनी राजकारणात उडी घेतली. त्यांना मनसेतून ७५ प्रभागांसाठी उमेदवारी मिळाली आहे. नगरसेवक होण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गंगाराम कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. ते ५४ वर्षांचे आहेत. त्यांनी चेंबूरच्या १३९ प्रभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यापाठोपाठ घाटकोपरचे रहिवासी निवृत्त एसीपी सुरेश मराठे यांना काँग्रेसमधून १३१ साठी उमेदवारी मिळाली आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे. मराठे हे १९८१ च्या बॅचचे आहेत. ठाण्यासह त्यांनी मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, अ‍ॅण्टॉप हिल, पंतनगर, बोरीवली, सहार, आझाद मैदान, गुन्हे शाखेमध्ये सेवा बजावली आहे. त्यानंतर वांद्रे येथे मे २०१३ मध्ये ते एसीपी म्हणून निवृत्त झाले. पोलीस खात्यात असताना असलेल्या जनसंपर्कावर उभे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)