नवी मुंबई : भंगारचोराकडे लाच मागणा:या दोघा पोलिसांवर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंगारचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा दोन वेळा फसल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 ऑगस्ट रोजी घडलेल्या भंगारचोरीच्या घटनेत भंगार व्यावसायिक नसीम शेख याचा हात असल्याचा पोलिसांचा संशय होता. या प्रकरणाचा तपास तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक फल्ले करत होते. त्यानुसार शेख यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी फल्ले यांनी दोन लाख रुपये लाच मागितली. याच पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक युवराज पाटील याचाही त्यात समावेश होता. शेख यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे यासंबंधीची तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासाठी सापळा रचला होता. यावेळी शेख हे एक लाख रुपये घेऊन आल्याने फल्ले यांनी ती रक्कम स्वीकारली नव्हती. त्यामुळे सापळा फसला. अखेर दुस:या वेळी देखील सापळा रचला असता फल्ले यांना शेख यांच्यावर संशय आल्याने त्याने ही रक्कम स्वीकारली नव्हती. त्यामुळे दोघांवरही तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विवेक जोशी यांनी सांगितले. याप्रकरणी अद्याप अटक झालेली नाही. (प्रतिनिधी)