लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जालंधर, पंजाब येथे अपहरणासह हत्येचा प्रयत्न करून मुंबईत लपलेल्या दोन गॅंगस्टर्सना कुर्ला परिसरातून गुन्हे शाखेने अटक केली आहेत. पंचमनूर सिंग (३१) आणि हिमांशू माटा (३१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पंजाबमधील जालंधर पोलिस ठाण्यात सिंग आणि माटा विरोधात १३ ऑक्टोबरला हत्येचा प्रयत्न, अपहरणासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. या दोघांनी त्यांच्या गँगचे वर्चस्व प्रस्थापित करून दहशत निर्माण करण्यासाठी एका व्यक्तीचे घातक हत्याराने अपहरण करून हत्येचा प्रयत्न केला होता. गुन्हा दाखल होताच दोघेही पंजाबमधून पसार झाले होते.
हॉटेलमधून घेतले ताब्यात दोघेही मुंबईत लपून बसल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या कक्ष पाचच्या पथकाने सापळा कुर्ला येथील कामरान रेसिडेन्सी हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीतांना पुढील कारवाईसाठी जालंधर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. गुन्हे शाखेच्या कक्ष पाचचे प्रभारी पो. नि. घनश्याम नायर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अजित गोंधळी, पोलिस हवालदार नितेश विचारे, पोलिस हवालदार हरेश कांबळे यांनी ही कामगिरी केली आहे. सिंग आणि माटा विरोधात जालंधर, पंजाब येथे घातक हत्यारानिशी खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे तसेच अग्निशस्त्रांची तस्करीचे असे एकूण ११ गुन्हे नोंद आहेत.