बुलेट ट्रेनच्या कामासाठी बीकेसीत दोन रस्ते ३० जूनपर्यंत राहणार बंद, वाहतूककोंडीत भर, कर्मचाऱ्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 01:06 PM2023-09-13T13:06:14+5:302023-09-13T13:06:42+5:30
Mumbai: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानाखाली बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूमिगत स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. त्या कामाला सुरुवात झाली असून त्यामुळे तेथील दोन रस्ते मंगळवारपासून बंद करण्यात आले आहे.
मुंबई - वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानाखाली बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूमिगत स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. त्या कामाला सुरुवात झाली असून त्यामुळे तेथील दोन रस्ते मंगळवारपासून बंद करण्यात आले आहे. पुढील वर्षात ३० जूनपर्यंत हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जातील, असे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे. यामुळे बीकेसी भागातील विविध कंपन्या, कार्यालये यामधील कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी हे सारे काम सुरू करण्यात आले असून बीकेसी परिसरात अनेक कार्यालये असल्याने सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीही नेहमी होते. पण आता या बदलामुळे आणखी त्रासाची भर पडणार आहे. बीकेसी मार्गावरील डायमंड जंक्शन ते जेएसडब्ल्यू कार्यालय आणि बीकेसी रोड प्लॅटिना जंक्शन ते मोतीलाल नेहरूनगर ट्रेड सेंटर दरम्यानच्या रस्त्यांवरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त प्रज्ञा झेडगे यांनी ही
माहिती दिली.
पर्यायी मार्ग...
एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोडने डायमंड जंक्शन येथून जेएसडब्ल्यू कार्यालय, खेरवाडी परिसर दिशेने जाणाऱ्या वाहनांना डायमंड जंक्शन नाबार्ड जंक्शन उजवे वळण घेऊन एशियन हार्ट रुग्णालय येथुन पुढे जेएसडब्ल्यू कार्यालय व खेरवाडी परिसरात जाता येईल.
खेरवाडी परिसर, एशियन हार्ट रुग्णालय, जेएसडब्ल्यू कार्यालयाकडून जाणाऱ्या वाहनांना एशियन हार्ट रुग्णालय- नाबार्ड जंक्शन येथून डावे वळण घेऊन डायमंड जंक्शन व बीकेसी परिसरात जाता येईल.
एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोडने मोतीलाल नेहरू नगरकडे जाणाऱ्या वाहनांना एमटीएनएल जंक्शनवरून डावीकडे वळून ट्रेड सेंटर, येथून मोतीलाल नेहरू नगरकडे जाता येईल.
मोतीलाल नेहरूनगर, ट्रेड सेंटरवरून प्लॅटिना जंक्शन बीकेसी परिसरात जाणारी सर्व वाहने ट्रेड सेंटर येथून डावे तसेच उजवे वळण घेऊन एमटीएनएल जंक्शनवरून पुढे प्लॅटिना जंक्शन व बीकेसी परिसरात मार्गस्थ होऊ शकतील.