Join us

बोलण्यात गुंतवून मुलुंडला आजोबांना दोघांनी लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 12:39 PM

मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  मुलुंडमध्ये एका वयोवृद्ध आजोबांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील १३ ते १४ तोळ्यांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना रविवारी मुलुंडमध्ये घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत. 

तक्रारदार ७५ वर्षीय आजोबा हे नातेवाईकांकडे जात असताना ही घटना घडली. ते पालिकेतून सेवानिवृत्त झाले. रविवारी सकाळी ते ठाण्यातील नातेवाईकाच्या घरी जात होते. येथील डम्पिंग रोडवरुन जात असताना एका अनोळखी तरुणाने त्यांना थांबवत पोलिस अधिकारी बोलवत असल्याचे सांगून रस्त्याच्या कडेला नेले. तेथे उभ्या असलेल्या अन्य साथीदाराने पोलिस असल्याची बतावणी करत तक्रारदार यांना विनामास्क फिरत असल्यावरुन विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने येथे चोऱ्या होतात असे सांगून दागिने काढण्यास सांगितले.

आजोबांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गळ्यातील १२ तोळे वजनाची सोनसाखळी, दीड तोळ्याच्या तीन अंगठ्या, चांदीच्या दोन अंगठ्या काढून त्याने दिलेल्या पेपरमध्ये गुंडाळल्या.  त्यानंतर, आरोपी दुकलीने बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील दागिने स्वतःकडे घेऊन पळ काढला. आजोबांनी पुढे जाऊन दागिने  तपासले तर पेपरमध्ये काहीही सापडले नाही.

 

टॅग्स :गुन्हेगारी