टिटवाळा : टुरिस्ट वाहने अनोळखी ठिकाणी नेऊन चालकाला हत्याराचा धाक दाखवून वाहने चोरणाऱ्या दोघांना सराईत गुन्हेगारांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. तर, एक जण फरारी आहे. कल्याण न्यायालयाने आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. ‘जस्ट डायल’ या आॅनलाइन पोर्टलद्वारे काही तरुण टुरिस्ट गाड्या मागवत असत. त्या कल्याण, मुरबाड व शहापूर तालुक्यांतील अनोळखी ठिकाणी नेऊन ते चालकाला हत्याराचा धाक दाखवून तसेच मारहाण करून गाडी पळवत असत. याबाबतची माहिती टिटवाळा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमोल कदम यांना मिळाली होती. त्यानुसार, कल्याण तालुक्यातील कोसले गावात पोलिस रवाना झाले. तेथे सापळा रचून त्यांनी कोसले येथील रहिवासी राजेंद्र (राज) देसले (२८), अर्जुन भोईर (२८) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जबरी चोऱ्या तसेच विरार, वालीव, वसई, वर्तकनगर, ठाणे शहर आदी ठिकाणांहून दोन टोयाटो इनोव्हा, एक शेव्हरलेट एन्जॉय, एक ह्युंडाई कंपनीची, अन्य एक गाडी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या गाड्या आणि एक मंगळसूत्र असा २१ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.दरम्यान, या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक समाधान नागरे, संदीप मुंढे, भिकन महाले, महेश वाघ, कृष्णा वाठारकर, रेश्मा पादीर सहभागी झाले होते. पुढील तपास पोलिस करत आहेत. (प्रतिनिधी)बोगस कागदपत्रांद्वारे गाड्यांची विक्रीबनावट व्यक्ती तयार करून बनावट कराराची कागदपत्रे, लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून व नंबर प्लेट बदलून ते गाड्यांची विक्र ी करत होते. फरारी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर अन्य गुन्हे उघडकीस येतील, असा आशावाद पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी व्यक्त केला.
दोन सराईत गुन्हेगारांना अटक
By admin | Published: April 14, 2016 1:27 AM