टाकीत बुडाली दोन भावंडे
By admin | Published: December 24, 2015 02:02 AM2015-12-24T02:02:28+5:302015-12-24T02:02:28+5:30
खेळताना पाण्याच्या टाकीमध्ये पडून दोन सख्ख्या भावंडांचा करुण अंत होण्याची हृदयद्रावक घटना गोरेगावमध्ये बुधवारी सकाळी घडली.
मुंबई : खेळताना पाण्याच्या टाकीमध्ये पडून दोन सख्ख्या भावंडांचा करुण अंत होण्याची हृदयद्रावक घटना गोरेगावमध्ये बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आले आहेत. या टाकीचे झाकण टाकीतच पडल्याचे दिसून आले.
गोरेगावमधील न्यू कृष्णानगर सोसायटीत विशाल सुनील भोजिया (४) आणि त्याचा भाऊ विकास (८) हे आजी-आजोबा आणि वडिलांसोबत राहत होते. त्यांचे काका चंदू भोजिया यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही भावंडे सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या अन्य काही मित्रांसोबत जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ खेळण्यासाठी गेले होते. बराच वेळ होऊनही न
परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा विशालचा जुळा भाऊ अजयने ते दोघे टाकीजवळ खेळत असल्याचे घरच्यांना सांगितले. त्यानुसार टाकीजवळ येताच दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे त्यांना दिसले. ही बाब लगेचच गोरेगाव पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे
मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पाठविले. (प्रतिनिधी)