मुंबईतील दोघांचा शहापुरात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:16 AM2017-08-01T03:16:36+5:302017-08-01T03:16:36+5:30
शहापूर तालुक्यातील बाबरे गावाजवळच्या नदीत रविवारी बुडालेल्या दोघा तरुणांचा मृतदेह सोमवारी सकाळी स्थानिक आदिवासींच्या मदतीने काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसनगाव : शहापूर तालुक्यातील बाबरे गावाजवळच्या नदीत रविवारी बुडालेल्या दोघा तरुणांचा मृतदेह सोमवारी सकाळी स्थानिक आदिवासींच्या मदतीने काढण्यात आले. हे तरुण मुंबईतील नागपाडा येथील आहेत. अक्र म महम्मद अस्लम अन्सारी (२२) व जैद महम्मद शमशुद्दिन अन्सारी (२६) अशी मृत तरु णांची नावे आहेत.
अक्रम आणि जैद या दोघांसह अदनान नौशाद खान, रफिक अन्सारी, सिकंदर शेख आणि सय्यद माजिद असे सहा तरुण बाबरे गावानजीकच्या नौशाद खान यांच्या फार्महाउसवर आले होते. रविवारी दुपारी सहा तरु ण उंभरी नदीत अंघोळीसाठी गेले असता नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. या पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जणांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर चौघे सुदैवाने बचावले आहेत.
या सहा जणांपैकी केवळ सय्यदला पोहता येत असल्याने त्याने अदनान, रफीक आणि सिकंदर या तिघांना मोठ्या शर्थीने नदी काठावर आणले. तर, अक्र म आणि जैद यांची शोध मोहीम अंधार झाल्याने थांबवण्यात आली होती. सोमवारी सकाळी उंभरी नदीतून अक्र म व जैद यांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याची माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही.ए. कामडी यांनी दिली. याबाबत अधिक तपास किन्हवली पोलीस करीत आहेत.