दक्षिण लोकसभा मतदारसंघात लढती दुरंगी की तिरंगी? उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 08:45 AM2024-10-04T08:45:58+5:302024-10-04T08:46:21+5:30
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून ८९,२४८ मते घेऊन राष्ट्रवादीचे सुरेश माने यांचा (२१,८२१) पराभव केला होता.
- महेश पवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभांपैकी कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल येथे यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट तर, भायखळा, शिवडी आणि वरळीमध्ये मनसे उमेदवारांमुळे तिरंगी लढत होईल. वरळीमधून आ. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेचे संदीप देशपांडे रिंगणात उतरतील. लोकसभेत अरविंद सावंत (उद्धवसेना) आणि भायखळाच्या आ. यामिनी जाधव (शिंदे सेना) यांच्यात थेट लढत झाली होती. सावंत यांचा विजय आणि विधानसभानिहाय मिळालेली मते पाहता येथे आपल्या आमदारांची संख्या वाढेल, असा मविआला विश्वास आहे.
उमेदवार की पाठिंबा?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून ८९,२४८ मते घेऊन राष्ट्रवादीचे सुरेश माने यांचा (२१,८२१) पराभव केला होता. आदित्य यांच्या पराभवासाठी महायुती येथून उमेदवार देणार की मनसेला पाठिंबा देणार यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. शिवडी विधानसभेत ठाकरे सेनेचे आ. अजय चौधरी यांच्याविरोधात मनसेने माजी आमदार बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. २०१९ मध्ये ३८,३५० मते घेऊन मनसेचे संतोष नलावडे दुसऱ्या क्रमांकांवर होते. यावेळीही येथे उद्धवसेना आणि मनसे यांच्यात प्रमुख लढत असेल.
भायखळा येथून यामिनी जाधव यांनी ५१,१८० मते घेऊन एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचा पराभव केला होता. मात्र, त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे मधुकर चव्हाण आणि मनसेचे संजय नाईक यांचे जाधव यांना आव्हान असेल. मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेस आ. अमीन पटेल यांची लढत भाजपचे माजी मंत्री राज पुरोहित यांच्याशी होईल.
२०१९ च्या निवडणुकीत ही जागा उद्धवसेनेने दिवंगत विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यासाठी मागून घेतली होती. मात्र, अमीन पटेल यांनी त्यांचा पराभव केला होता. याशिवाय मनसेही लढविणार असल्याने येथे तिरंगी लढत होईल. भाजप मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा समजला जाणारा मतदारसंघ म्हणजे मलबार हिल. २०१९ मध्ये काँग्रेसचे हिरा देवासी यांनी येथून निवडणूक लढविली. मात्र, लोढा यांनी ९३,५३८ मते घेतली.
२०१९ च्या निवडणुकीत कुलाबामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत झाली. परंतु, नार्वेकर यांनी ५७,४२० मते घेऊन भाई जगताप काँग्रेस (४१,२२५) यांचा पराभव केला. येथे नार्वेकर हेच उमेदवार असतील मात्र, काँग्रेस उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे.