टेम्पोच्या धडकेने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By admin | Published: February 7, 2017 05:27 AM2017-02-07T05:27:33+5:302017-02-07T05:27:33+5:30
नालासोपारा येथील संतोष भुवननजीक भरधाव टेम्पोने धडक दिल्याने रस्ता ओलांडणारे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले असून एका महिलेसह दोन जखमी झालेत.
वसई : नालासोपारा येथील संतोष भुवननजीक भरधाव टेम्पोने धडक दिल्याने रस्ता ओलांडणारे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले असून एका महिलेसह दोन जखमी झालेत. अपघातानंतर लोकांनी तीन तास रास्ता रोको करून टेम्पोची तोडफोड केली. तसेच चालकालाही मारहाण केली. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यावेळी झालेल्या झटापटीत तीन पोलीस जखमी झाले.
सोमवारी सकाळी दहाच्या सुमारासे ही घटना घडली. भरधाव वेगामुळे चालकाचे टेंपोवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्ता ओलांडणाऱ्या चौघांना जोरदार धडक दिली. त्यात विद्याभारती शाळेत जाणाऱ्या आदित्य प्रजापती (५) , अल्मन आवारी (५) या दोघे जागीच ठार झाले. तर अफसाना बेगम (३५) आणि संदीप विश्वकर्मा (२०) हे जखमी झाले. संतापाचा बांध फुटल्याने आंदोलकांनी जोरदार दगडफेक करून मनपाची परिवहन बस, वाहतूक शाखेची जीप व तुळींज पोलीस स्टेशनची जीप यांच्या काचा फोडल्या. दगडफेकीत पोलीस राजेंद्र केदार, पोलीस नाईक योगेश घुगे आणि वाहतूक शाखेचे पोलीस नाईक चव्हाण जखमी झाले. तुळींज पोलिसांनी टेंपो चालक शिवकुमार कांदू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)