पुणे फिरण्यासाठी बोरीवलीतील दोन विद्यार्थी झाले बेपत्ता; दोन दिवसांनी परतले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 04:26 AM2019-05-15T04:26:13+5:302019-05-15T04:26:35+5:30
पुणे फिरण्यासाठी कुटुंबीय परवानगी देणार नाहीत, ओरडतील म्हणून दोन विद्यार्थ्यांनी कुटुंबीयांना काहीही न सांगता घर सोडले. दोन दिवसांनी ते घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला.
मुंबई : पुणे फिरण्यासाठी कुटुंबीय परवानगी देणार नाहीत, ओरडतील म्हणून दोन विद्यार्थ्यांनी कुटुंबीयांना काहीही न सांगता घर सोडले. दोन दिवसांनी ते घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला.
बोरीवलीच्या शिंफोली परिसरात तक्रारदार या कुटुंबीयांसोबत राहतात. शुक्रवारी त्या कामावरून घरी परतल्या तेव्हा, मोठा मुलगा भावेश (१७) घरात नव्हता. मुलीकडे चौकशी केली तेव्हा, दुपारी तीनच्या सुमारास मित्र प्रताप ठाकूर (१५) घरी आला होता. दोघेही शाळेची बॅग घेऊन गेल्याचे मुलीने सांगताच त्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर फोन केला. मात्र मोबाइल बंद आला. त्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. बराच वेळ झाला म्हणून त्यांनी त्याचा शोध सुरू केला; मात्र दोघांचाही काहीही थांगपत्ता लागला नाही.
अखेर, शनिवारी बोरीवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बोरीवली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या प्रकारामुळे परिसरातही खळबळ उडाली. तपास सुरू असताना दोघेही रविवारी घरी परतले. त्यांना पाहून कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांच्याकडे चौकशी केली असता, यापूर्वी ते कुटुंबीयांसोबत पुण्यात गेले होते. त्यानंतर भावेशला पुन्हा पुणे फिरायचे होते.
घरातून परवानगी मिळणार नाही, उलट विचारले की ओरडा पडेल म्हणून दोघांनीही कुणाला न सांगता पुण्याला जाण्याचे ठरविले. पाकीट खर्चातून जमविलेल्या रकमेतून त्यांनी पुणे गाठले. त्यानंतर मनसोक्त पुणे फिरून झाल्यानंतर ते घरी परतल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले.