मुंबई/ दिल्ली: मुंबई आणि दिल्लीत घातपाताचा कट आखणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी एका दहशतवाद्याचं मुंबईतील सायन परिसरात वास्तव्य होतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जान मोहम्मद अली शेख, असं अटक करण्यात आलेल्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकानं मंगळवारी जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जीशान कमर आणि ओसामा यांना पाकिस्तानात दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं आहे. या दहशतवाद्याच्या माध्यमातून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात पुन्हा एकदा हल्ला घडवण्याचं षडयंत्र रचत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम पाकिस्तानात लपून बसला आहे. तोच या सगळ्या प्लॅनिंगचा मास्टरमाईंड आहे. अनीस इब्राहिम अंडरवर्ल्डच्या माध्यमातून दहशतवादी मॉड्यूलला सपोर्ट करत आहे. अनीस दहशतवाद्यांना पैसे पुरवतो त्याचसह सीमेपलीकडे हत्यारं आणि स्फोटक पदार्थ नेआण करण्यासाठीही मदत करतो.
चौकशीच्या आधारे यूपीमधून तीन जणांना अटक करण्यात आली. यापैकी दोन लोक यावर्षी एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानात नेण्यात आले. तेथे ते एका फार्म हाऊसमध्ये राहत होते. येथेच त्यांना स्फोटकं बनवण्याचे आणि इतर प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सुमारे १५ दिवसांचे होते. या प्रशिक्षणानंतर हे लोक तेथून मस्कतला परत आले होते.
पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेल्या दोन दहशतवाद्यांना ज्या फार्म हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, तिथे पाकिस्तानी लष्करातील व्यक्तींनी बनावट नावे आणि बनावट हुद्दे वापरले होते. मात्र ज्या व्यक्तीने दोन्ही दहशतवाद्यांना फार्म हाऊसवर नेले तोच साध्या गणवेशातील खरा लष्करी अधिकारी होता, असं समोर आलं आहे. फार्म हाऊसमध्ये फक्त साध्या गणवेशातील व्यक्तीलाच सलाम केला जात होता. पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात ज्या व्यक्ती होत्या, त्या ISI मध्ये अत्यंत कनिष्ठ पदावर होत्या, त्यामुळे गणवेशात असूनही कोणीही त्यांना सलाम करत नव्हते, असा खुलासा दोन्ही दहशतवाद्यांनी चौकशीत केला.
१९९३ च्या बॉम्बस्फोटासारखा कट
दिल्ली पोलीस अधिकारी नीरज ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे, दहशतवाद्यांच्या या टीमचं काम सीमेपलीकडून हत्यारं आणून त्याला देशातील विविध राज्यात पोहचवण्याचं होतं. अनीस इब्राहिम हा दाऊद इब्राहिमसारखा १९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रमाणे कट रचण्याचा प्रयत्नात होता. पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊन इब्राहिमविरुद्ध मागील काही वर्षात कठोर कारवाई करण्यात येत आहे. देशात डी कंपनीच्या संपत्तीचा लिलाव केला जात आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम खवळला आहे. त्यामुळे आपली ताकद दाखवण्यासाठी ISI सोबत मिळून भारताविरुद्ध षडयंत्र रचण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसनं हे षडयंत्र उधळून लावलं आहे.