Join us

मुंबईत अतिदक्षता विभागात दाखल असलेले दोनतृतीयांश रुग्ण लसीकरण न झालेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:09 AM

मुंबई : मुंबईच्या रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात कोरोना विषाणूवर उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी दोनतृतीयांश रुग्णांचे लसीकरण झाले नसल्याचे समोर आले आहे. ...

मुंबई : मुंबईच्या रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात कोरोना विषाणूवर उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी दोनतृतीयांश रुग्णांचे लसीकरण झाले नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात मुंबईबाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत, यामुळे अशी परिस्थिती निदर्शनास येत आहे. मुंबईमध्ये काही वेळा लसीचा तुटवडा जाणवत असला तरी लसीकरण वेगात सुरू असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. सध्या ही लाट ओसरत असल्याने ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी १० टक्के रुग्णांना लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागते. इतर रुग्ण घरी राहून बरे होतात. अशा परिस्थितीत मुंबईमधील रुग्णालयांतील बेड्स रिक्त आहेत. त्यावर मुंबईबाहेरील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मुंबईमध्ये चांगले उपचार केले जात असल्याने राज्यातून तसेच देशभरातून रुग्ण पालिकेच्या रुग्णालयांत येतात.

मुंबईत पहिला डोस घेतल्यानंतरही १० हजार ५०० जणांना कोरोना झाला. मात्र दुसरा डोस घेतलेल्या अवघ्या २६ जणांनाच कोरोना झाला, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. शहर उपनगरात आतापर्यंत १ कोटी ४१ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीच्या पुरवठ्यात नियमन राहिल्यास गतीने मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, लसीची उपलब्धता असूनही लसीकरणापासून वंचित राहणे ही बाब चुकीची आहे. लस घ्यायला हवी, या माध्यमातून आजार झाल्यास संसर्गाची तीव्रता सौम्य होते, लसीकरण लाभदायी आहे हे सर्वसामान्यांनी लक्षात घेतले पाहिजे.