एमएमआरडीएचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाच्या निर्देशानुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मालाड येथे २ हजार बेडचे कोविड सेंटर बांधले जात असून, पावसाळ्यापूर्वी हे कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता विविध स्तरावर उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याच उपाययोजनांचा हा एक भाग असून, कोरोना रुग्णांना अत्यंत चांगल्या दर्जाच्या सेवा मिळाव्यात यासाठी काम केले जात आहे. मालाड येथील कोविड सेंटर बांधून पूर्ण झाल्यावर मुंबई महापालिकेच्या स्वाधीन केले जाणार आहे.
एमएमआरडीएने बीकेसी येथे उभारलेल्या कोविड सेंटरला जवळजवळ वर्ष पूर्ण होत आहे. मुंबई महापालिका हे कोविड सेंटर चालवीत असून, या सेंटरने अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे. बीकेसीनंतर प्राधिकरणाच्या वतीने मालाड येथे कोविड सेंटर तयार करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरमध्ये २ हजार बेड असतील. यात १४०० बेड ऑक्सिजन, तर ६०० नॉन ऑक्सिजन बेड, २०० आयसीयू असतील. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली साधारणत: २० हजार चौरस मीटर जागेवर ५४ कोटी रुपये खर्चून हे कोविड सेंटर उभारले जात आहे. यासाठी या कोविड सेंटरचे काम १५ दिवसांत पूर्ण होईल व पावसाळ्यापूर्वी ते रुग्णांच्या सेवेत दाखल होईल, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला.
* काेविड रुग्णांसाठी जम्बो सुविधा
बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल उभारले. जुलै महिन्यात बीकेसी येथे दुसरा टप्पा उभारण्यात आला होता. रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटरचे नियोजन करण्यात आले. धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले. भायखळा येथील रिचर्डसन क्रूडास कंपनीच्या आवारातील सेंटरमध्ये उपचाराची सोय करण्यात आली. मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स आणि बीकेसी येथे जम्बो सुविधा देण्यात आल्या.
----------------