Join us

दोन हजार झाडांच्या कत्तलीविरोधात आरेत दोन हजार नागरिक रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:30 AM

मेट्रो कारशेडला विरोध : ‘आरे वाचवा, जंगल वाचवा’चा दिला नारा

मुंबई : ‘आरे वाचवा, जंगल वाचवा’ नारा देत रविवारी सकाळी भर पावसात आरेमध्ये दोन हजार नागरिकांसह पर्यवरणप्रेमींनी मोठी मानवी साखळी करून येथील २ हजार ३२८ वृक्षतोडीला जोरदार विरोध केला. ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत चालणाऱ्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस व आपचे सदस्य आपल्या पक्षाचे झेंडे व चिन्हे घेऊन उपस्थित होते. काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनीही नागरिक म्हणून या निषेधात भाग घेतला.

मेट्रो ३ कारशेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने गोरेगाव (पूर्व) आरेतील २ हजार ३२८ झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. या विरोधात तरुणाईसह अनेक पर्यावरणवादी संस्था एकवटल्या आहेत. रविवारी सकाळपासूनच आरे वनविभागातील आदिवासी व मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि इतर अनेक ठिकाणांहून आलेले विविध पर्यावरण संस्थांचे कार्यकर्ते, महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिक आरे पिकनिक स्पॉटजवळ एकत्र जमले होते. आरे कन्झर्व्हेशन ग्रुप, म्यूझ यांसारख्या संस्था व संघटनाही साखळीत सहभागी झाल्या होत्या, तर बायकर्स ग्रुपच्या दुचाकीस्वारांनी दुचाकीवर स्वार होऊन विरोध केला. ही मानवी साखळी गोरेगाव पूर्व, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या दिशेने कारशेड क्षेत्राच्या उलट बाजूपर्यंत वाढविण्यात आली होती.

जोपर्यंत येथील २ हजार ३२८ झाडे कापण्याचा निर्णय शासन व महापालिका मागे घेत नाही, तोवर आमचे आंदोलन हे सुरूच राहिल, तसेच अधिक व्यापक करण्यात येईल. आरेतील वृक्षतोडीच्या विरोधात सुमारे ८२ हजार हरकती आल्या असून, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत येथील वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आरे हा मुंबईचा मोठा हरित पट्टा असून, आरे वाचविण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून विरोध करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी यश मारवा यांनी केले.सुप्रिया सुळे घेणार मुख्यमंत्र्यांची भेटपर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे, विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, आरेतील वृक्षतोडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. आरेतील मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाºया वृक्षतोडीप्रश्नी १२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रविवारी सकाळी आरे कॉलनीच्या नियोजित मेट्रो कारशेडला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. ‘आरे’त उभारण्यात येणाºया कारशेडची पाहणी करून, येथील आदिवासी बांधव व पर्यावरणप्रेमींशी सविस्तर चर्चा केली, तर मेट्रो कारशेडबाबत त्यांनी प्रशासनाकडून माहिती व नकाशा समजावून घेतला. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी आरेच्या वृक्षतोडी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे यावरून पर्यावरणप्रेमींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली, शिवाय मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. मलिक यांनी विरोधात मतदान का केले? याबाबत त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल, असे सुळे यांनी सांगितले.शिवसेनेची दुटप्पी भूमिकाशिवसेना खासदार गजानन कीर्तिकर हेदेखील आंदोलनात सामील झाले होते. कीर्तिकरांनी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. आरेतील वृक्षतोडीला मुंबईसह राज्यभरातून विरोध सुरू आहे. सोशल मीडियावर लोक आपापली भूमिका मांडत आहेत. प्रशासन हे विरोधाचे मेल स्वीकारत नसून लेखी स्वरूपात द्या, असे सांगत आहे. एकीकडे शिवसेना पक्ष हा आरेतील मेट्रो कारशेडच्या विरोधात आहे, असे सांगतो, तर दुसरीकडे त्यांचेच खासदार प्रशासनाच्या बाजूने बोलत आहेत.- प्रशांत टाककर, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :आरेमेट्रोशिवसेना