मुंबई : पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबईत दोन हजार इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या बस सेवांमध्येही वाढ करण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वतःच्या व भाडेतत्त्वावरील डिझेल, सीएनजीवर धावणाऱ्या बस गाड्यांसह २८८ इलेक्ट्रिक बसगाड्या आहेत. पुढील दोन महिन्यांत १०० एक मजली इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. डिसेंबर २०२२ पर्यंत एक हजार ९०० इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचे बेस्टचे लक्ष्य आहे. यामध्ये वातानुकूलित आणि विनावातानुकूलित एकमजली, मिडी बसचा समावेश असेल.
बेस्टच्या ताफ्यात सध्या ४८ दुमजली बस, एकमजली १,४७७ बस आणि मिडी ४६०, इलेक्ट्रिक सहा बसगाड्या आहेत. उर्वरित बस या भाडेतत्त्वावरील आहेत. इलेक्ट्रिक एकमजली बसबरोबरच दुमजली शंभर बसचाही समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. यापैकी चारशे बस डिसेंबर २०२१ पर्यंत दाखल होणार आहेत. सीएनजी आणि डिझेलवर चालणाऱ्या बस गाड्यांवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसमागे नऊ रुपये खर्च येत आहे.