मुंबई :म्हाडाच्या वतीने लाॅटरी काढण्यात येणाऱ्या दोन हजार ३० घरांसाठी गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत एक लाख २९ हजार ६६५ अर्ज दाखल झाले. त्यांपैकी एक लाख पाच हजार ८७७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे.
म्हाडाने अर्ज करण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत दिली होती. गुरुवारी दुपारी ही मुदत रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे दोन हजार ३० घरांसाठी दाखल अर्जांसह अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांचा अंतिम आकडा शुक्रवारी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली.
म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मध्यमवर्गीयांना भूरळ पडत असल्याचे मिळालेल्या प्रतिसादावरून निदर्शनास येते.
लोकमतच्या वृत्ताची दखल, किमती घटवल्या
म्हाडाला बिल्डरांकडून मिळालेल्या गृहसाठ्यापैकी ३७० सदनिकांच्या किमती सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती २५ टक्क्यांनी, अल्प गटातील घरांच्या किमती २० टक्क्यांनी, मध्यम गटातील सदनिकांच्या किमती १५ टक्क्यांनी आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. घरांच्या किमती अधिक असल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले होते.
तांत्रिक अडचणींचा सामना
शेवटच्या दिवशी योग्य आधार ओटीपी टाकला असता आधार ओटीपी चुकीचा दाखवला जात होता. आयटीआर व्हेरिफिकेशन होत नव्हते. पुन्हापुन्हा व्हेरिफिकेशनला अर्ज जात होते. शासकीय प्रमाणपत्र, आयटीआर, डोमिसाईल, जात प्रमाणपत्र योग्य असूनही व्हेरिफिकेशन वेळेत होत नव्हते. त्यामुळे अनेकांना अर्ज भरता आले नाही, अशा एक ना अनेक तक्रारी अर्जदारांनी केल्या.
अर्ज भरताना तांत्रिक समस्या येत होत्या. सर्व्हर डाउन होता. दोन दिवस शासकीय सुट्टीही होती. म्हाडाच्या कागदपत्र तपासणी यंत्रणेत त्रुटी असल्याने अनेकांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे अर्ज भरता आले नाहीत.
- संदीप सावंत, गोरेगाव
अर्ज ते सोडत
२७ सप्टेंबर : अर्जदारांच्या प्रारूप यादीला वेबसाइटवर प्रसिद्धी
२९ सप्टेंबर, दुपारी १२ पर्यंत : ऑनलाइन दावे, हरकती सादर करण्याची मुदत
३ ऑक्टोबर, सायंकाळी ६ : अंतिम यादीला प्रसिद्धी
८ ऑक्टोबर, सकाळी ११ : यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सोडत.