ओडिशातून गांजाची तस्करी, तब्बल दोन हजार किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 04:17 PM2018-09-14T16:17:18+5:302018-09-14T16:18:04+5:30
नक्षल प्रभावित बस्तर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात हा गांजा येण्याच्या आधीच त्याला जप्त करण्यात आले.
खलील गिरकर
मुंबई - महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) ने केलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर 3 कोटी रूपये किंमतीचा 2 हजार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. डीआरआयचे सह आयुक्त समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई व नागपूरच्या डीआरआय पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक आरोपी आंध्रप्रदेश, छत्तीसगड व ओडिशा येथील मोस्ट वाँटेड आरोपी आहे.
नक्षल प्रभावित बस्तर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात हा गांजा येण्याच्या आधीच त्याला जप्त करण्यात आले. डीआरआयचे उपायुक्त दिलीप शेवरे यांनी त्यांच्या पथकासह या कारवाईत सहभाग घेतला होता. ओडिशातील मलकनगिरी येथून नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात एका ट्रकमधून दोन हजार किलो गांजा घेऊन जात असल्याची माहिती महसूल गुप्तचर महासंचालनालयास गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. त्यानुसार कारवाईची तयारी करण्यात आली. त्यामध्ये तीन कोटी रूपये किंमतीचा दोन हजार किलो गांजा जप्त करण्यात आला. रायपूर येथील सीजीएसटीचे पथक व आंध्र प्रदेशच्या पोलिसांचे या कारवाईमध्ये सहकार्य मिळाले. यापूर्वी जून महिन्यात डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये 6 हजार किलो गांजा जप्त करण्यात आला होता. तो गांजाही ओडिशामधील मलकनगिरी येथून आणला जात होता. आता जप्त करण्यात आलेला गांजा त्याच टोळीशी संबंधित असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.