Join us

दोन हजार रुपयांची नोट घ्यावीच लागेल! व्यापारी संघटनेची दुकानदारांना स्पष्ट सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 10:50 AM

घाबरून जाण्याचे कारण नाही, असे म्हणत व्यापारी संघटनेने ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेतल्यानंतर नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून, बाजारपेठेत २ हजार रुपयांचे व्यवहार वाढले आहेत. मात्र, काही ठिकाणी दुकानदार दोन हजार रुपयांची नोट स्वीकारत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने दुकानदारांना दोन हजारांची नोट स्वीकारावीच लागेल, अशी स्पष्ट सूचना केली आहे. 

घाबरून जाण्याचे कारण नाही, असे म्हणत व्यापारी संघटनेने ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सगळ्या दुकानदारांना सांगून ठेवले आहे की, तुम्ही दोन हजार रुपयांची नोट घ्या आणि बँकेत जमा करा. त्यामुळे दुकानदारांमध्ये आता गोंधळ नाही. नागरिकांमध्ये मात्र गोंधळ आहे. 

पहिल्यांदा ग्राहक दोन हजार रुपयांची नोट काढत नव्हते. पहिल्या दोन ते तीन महिन्यांत दिवसाला दुकानदाराकडे दोन हजारांच्या सरासरी २० नोट येत होत्या. आता मात्र दिवसाला हे प्रमाण ४०० टक्के वाढले आहे. ग्राहक दोन हजारांच्या नोटा देत आहे, असे असोसिएशनचे विरेन शाह यांनी सांगितले.

डिजिटल पेमेंट कमी होत आहे. दोन हजारांच्या नोटा अधिक येत आहेत. मात्र, घाबरण्याचे कारण नाही. दुकानदार नोट घेत आहेत. कदाचित काळ्या बाजारात या नोटा अधिक असतील म्हणून आता याचे व्यवहार वाढले असतील.- विरेन शाह, अध्यक्ष,फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन

ग्राहक सुरुवातीला घाबरत होते. मात्र, आता संभ्रम दूर झाला आहे. सराफ बाजारातही दोन हजारांची नोट घेतली जात आहे. झवेरी बाजारासह सोन्याच्या बाजारपेठेत आता दोन हजारांच्या नोटेबाबत काही अडचणी नाहीत.- कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन

टॅग्स :नोटाबंदीभारतीय रिझर्व्ह बँक