Join us  

तब्बल दोन हजार अनधिकृत सिलिंडर जप्त

By admin | Published: November 06, 2015 3:06 AM

कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा उपाहारगृहात झालेल्या दुर्घटनेत आठ निष्पाप जिवांचा बळी गेला आणि खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेने जणू काही उपाहारगृहांवरील

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा उपाहारगृहात झालेल्या दुर्घटनेत आठ निष्पाप जिवांचा बळी गेला आणि खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेने जणू काही उपाहारगृहांवरील कारवाईचा सपाटाच लावला. या अंतर्गत १९ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान तब्बल २ हजार ५९६ उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली असून, या कारवाई अंतर्गत १ हजार ९३६ अनधिकृत सिलिडर जप्त करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे २ हजार १३३ उपाहारगृहांवर महापालिकेच्या नियम व पद्धतींनुसार कार्यवाही करण्यात येत आहे, असेही प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले आहे.कुर्ल्यातील दुर्घटनेनंतर उपाहारगृहांवरील कारवाईसाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांत प्रत्येक विभागस्तरावर एका विशेष चमू स्थापन करण्यात आला आणि सर्वच विभागांत उपाहारगृहांच्या तपासणीचा सपाटा सुरू करण्यात आला. दररोज २२० उपाहारगृहांची तपासणी आणि कारवाई सुरू असतानाच मध्य मुंबईतील कारवाईवेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची एका उपाहारगृहधारकासोबत बाचाबाचीही झाली आणि या घटनेची नोंद पोलीस ठाण्यातही करण्यात आली. परंतु अशा घटनेला महापालिका प्रशासनाने जुमानले नाही. उलटपक्षी कारवाईला अधिक वेग दिला आणि दक्षिण-मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नामांकित उपाहारगृहांवरील कारवाई सुरूच ठेवली. महापालिकेची कारवाई सुरू असतानाच अनेक उपाहारगृहांमध्ये त्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक सिलिडर अनधिकृतरीत्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले. हे सर्व अनधिकृत सिलिंडर जप्त करण्यात आले. तसेच उपाहारगृहांमध्ये आढळून आलेले अनधिकृत बांधकाम, अनधिकृत शेड हटविण्यात आले आहे. अग्निसुरक्षाविषयक बाबींचीही तपासणी सुरू असून, उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार आर/दक्षिण विभागात सर्वाधिक म्हणजे १५० उपाहारगृहांवर कारवाई करण्यात येत आहे. तर सर्वाधिक म्हणजे १८७ सिलिंडर हे पी/उत्तर विभागातून जप्त करण्यात आले आहेत. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)अग्निसुरक्षाविषयक फलक पाहाज्या उपाहारगृहातील अग्निसुरक्षा परिपूर्ण असेल त्या सर्व उपाहारगृहांच्या प्रवेशद्वारांवर ‘हा परिसर अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे’ असा संदेश असलेला व किमान ७५ मिमी पेक्षा अधिक आकाराच्या अक्षरात असलेला फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उपाहारगृहात जाताना अग्निसुरक्षा विषयक फलक असलेल्या उपाहारगृहाला भेट द्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाद्वारे करण्यात आले आहे.प्रत्येक उपाहारगृहात किती ‘गॅस सिलिंडर’ असावेत व ते कशाप्रकारे ठेवले जावेत, तसेच उपाहारगृहामध्ये परिपूर्ण अग्निसुरक्षा कशी असावी, याबाबत जारी करण्यात आलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी मार्गदर्शक सूचनांचे परिपूर्णपणे पालन करावे, असेही आवाहन मुंबई अग्निशमन दलाद्वारे करण्यात आले आहे.आर/दक्षिण, आर/मध्य आणि आर/उत्तर विभागात कारवाईमहापालिकेच्या आर/दक्षिण, आर/मध्य आणि आर/उत्तर विभागातील उपाहारगृहांवर गुरुवारी धडक कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. शिवाय अवैध साहित्य जप्त करण्यात आले.आयुक्त अजय मेहता यांच्या निर्देशानुसार संबंधित वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.आर/दक्षिण विभागातील ७ उपाहारगृहांची पाहणी करून ७ सिलिंडर, २ लाकडी बाकडे, ३ लोखंडी बाकडे, १ आयर्न शेगडी रेग्युलेटरसह, १ स्टोव्ह, १ वडापाव बाकडे हे साहित्य जप्त करण्यात आले.आर/मध्य विभागात १२ उपाहारगृहे असून आर/उत्तर विभागात ९ उपाहारगृहांची पाहणी करून ९ सिलिंडर, १० टेबल व खुर्च्या आणि १२ शेगडी व भांडी हे साहित्य जप्त करण्यात आले.कुर्ल्यातील दुर्घटनेनंतर उपाहारगृहांवरील कारवाईसाठी पालिकेच्या सर्व २४ विभागांत एक विशेष चमू स्थापन करण्यात आली. आणि उपाहारगृह तपासणीचा सपाटा सुरू करण्यात आला. मध्य मुंबईतील अशा कारवाईवेळी कर्मचाऱ्यांची एका उपाहारगृह मालकासोबत बाचाबाचीही झाली होती.