मुंबई - लोकलमधील तांत्रिक बिघाड, बेस्टचे रडगाणे, मेट्रो गर्दी या आणि अन्य सार्वजिनक वाहतूक व्यवस्थेच्या निष्क्रियता खासगी कंपन्यांच्या पथ्यावर पडत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सर्वाधिक ६११ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शहराच्या वाहतूक कोंडीत सुमारे दोन हजार वाहनांची भर पडली असून यात १०८० दुचाकी आणि ७९२ चारचाकी या आणि अन्य वाहनांचा समावेश आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून दसरा सण साजरा केला जातो. या मुहूतार्चा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडून वाहन खरेदीला विशेष महत्त्व निर्माण देण्यात येत. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला (बुधवार) अंधेरी आरटीओत ३४३ वाहनांची नोंदणी झाली. यात १४१ पेक्षा जास्त दुचाकी तर २०२ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. दसऱ्याच्या दिवशी (गुरुवार) एकूण २६८ वाहनांची नोंदणी झाली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंधेरी आरटीओत एकूण ६११ नोंदणी करण्यात आली.आरटीओच्या माहितीनूसार, ताडदेव आरटीओत ५८५ वाहनांची नोंद करण्यात आली आहे. बोरीवली आरटीओत ३३२ वाहनांची आणि वडाळा आरटीओत ४७४ वाहनांची नोंदणी झाली आहे.लोकलमधील तांत्रिक बिघाड, वाहतूक कोंडीत अडकणाºया बेस्ट, मेट्रोमार्गावरील गर्दी यांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील विश्वासात दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे प्रवास सुखद आणि आरामदायी होण्यासाठी नागरिकांकडून स्वत:चे वाहन असण्याची इच्छा बळावत असल्याचे वाहतूक तज्ञांचे मत आहे. शहरात सुरु असलेल्या मेट्रो कामांच्या बॅरिकेटसमुळे रस्ता अरुंद होत आहे. शिवाय शहरात वाहन उभे करण्यासाठी जागेची वानवा आहे. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहराच्या वाहतूक कोंडीत दोन हजार वाहनांची भर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 9:02 PM