लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रेल्वेच्या अमृत भारत स्थानक विकास योजनेत मध्य रेल्वेवरील ३८ स्थानकांचा समावेश असून त्यासाठी १,६९६ कोटी रुपये खर्च येणार आहे. परळ, विक्रोळी आणि कांजूरमार्ग या तीन स्थानकाच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. १ ऑगस्टपासून कामाला सुरुवात झाली असून ६५ कोटी रुपये खर्च त्यासाठी येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. उल्लेखनीय म्हणजे ही तीनही स्थानके अनुक्रमे शिवसेना शिंदे गट (खा. राहुल शेवाळे, परळ-दक्षिण मध्य मुंबई) आणि भाजप (खा. मनोज कोटक, विक्रोळी, कांजूरमार्ग- ईशान्य मुंबई) खासदारांच्या लोकसभा मतदारसंघातील आहेत.
म. रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार परळ, विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकाचा विकास करण्यासाठी ६५.५८ कोटी रुपये खर्च येणार आहे. स्थानकांचा मॉडर्न लूक देण्यासाठी आर्किटेक्ट नेमण्यात आला होता. डिझाईन निश्चित केल्यानंतर गेल्या अर्थसंकल्पात निधी देण्यात आला. आधी आर्किटेक निविदा, त्यानंतर बांधकाम निविदा, सिग्नल अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिक कामांच्या निविदा जुलैमध्ये काढण्यात आल्या होत्या. त्याच्या कामाला १ ऑगस्टमध्ये सुरुवात झाली. ही कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने लवकरच चकाचक स्थानके दिसणार आहेत.
कोणती कामे केली जाणार नियोजित सोयीसुविधा भव्य इमारत, नवीन स्वछतागृह प्रत्येक स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा स्थाकावरील वीज व्यवस्थेत सुधारणा चांगल्या दर्जाच्या फॅनची व्यवस्था स्थानकात परिसरात दिव्यांगजणासाठी सुधारणा स्थानकावरील फलाटामध्ये सुधारणा नवीन सुधारित ट्रेन इंडिकेटर लिफ्ट लावण्यात, एस्कलेटर लावले जाणार बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण होणार
परळ, कांजूरमार्ग आणि विक्रोळी स्थानक पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्थानकात बांधकाम, सिग्नल अँड कम्युनिकेशन , इलेक्ट्रिक काम करण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारी ते मार्चमध्ये ही कामे पूर्ण होतील. - शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे