मुंबई - २६/११ च्या हल्ल्याला १५व्या स्मृतिदिनीच मानखुर्दमध्ये दोन ते तीन दहशतवादी आले आहेत, त्यांची भाषा मला समजत नाही, त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे, त्यांच्याकडे बॅग आहे, ही माहिती कॉलरने दिल्याने खळबळ उडाली. मानखुर्द पोलिसांनी तत्काळ कॉलरला ताब्यात घेत चौकशी करताच दारूच्या नशेत त्याने तो कॉल केल्याचे समोर आले.
रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मुख्य पोलिस नियंत्रण कक्षाला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलरने ‘मानखुर्द पोलिस चौकी, एकता नगर या ठिकाणी दोन ते तीन आतंकवादी आले होते. त्यांची भाषा मला समजत नाही. त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे, त्यांच्याकडे बॅग आहे. त्यांनी कॉलरला बाथरूमला जाण्याचा रस्ता विचारला,’ असे सांगून कॉल कट केला. मानखुर्दसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे कॉल आल्याने पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली. एकता नगर या ठिकाणी शोध घेतला, मात्र संशयित सापडले नाहीत. अखेर कॉलरला पुन्हा कॉल केला, मात्र त्याचा फोन बंद लागला.
कॉलरच्या लोकेशनवरून त्याचा शोध घेतला असता तो एकता नगर, मानखुर्द येथे त्याच्या राहत्या घरी मिळून आला. किशोर लक्ष्मण ननावरे असे कॉलरचे नाव असून, तो मद्यपी निघाला.
अखेर सीसीटीव्हीतून सत्य समोर मद्यपी कॉलरकडे केलेल्या चौकशीत, तो बार येथून दारू पिऊन घरी जात असताना, एका व्यक्तीने त्याचा मोबाइल फोन करण्याकरिता मागितला, कोणाला फोन लावला हे त्याला माहीत नाही. फोनवर बोलत कॉलरला त्याच्या घराजवळ सोडून कॉलर निघून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी कॉलरच्या बोलण्यात तथ्य आहे किंवा कसे याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, कोणीही संशयित आतंकवादी दिसून आले नाही. माहिती खोटी असल्याचे चौकशीत निष्पन्न होताच त्याच्यावर कारवाई केली. ही कारवाई प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.