Join us

मुंबईतील दोन जलबोगद्यांचे काम वेगाने सुरू, 'या' भागांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 7:46 PM

Mumbai News : अमर महल ते ट्रॉम्बे निमनस्तर जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतच्या जलबोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे.

मुंबई - घाटकोपर पूर्व, हेडगेवार मैदान (अमर महल ) ते प्रतिक्षा नगर वडाळा ते सदाकांत ढवळ उद्यान (परळ) पर्यंत ९.६ किलोमीटरचा जलबोगदा बांधण्यात येत आहे. तसेच हेडगेवार मैदान ते आरसीएफ ते बीआरसी दरम्यान साडेपाच किलोमीटरचा जलबोगदा तयार होणार आहे. हा जलबोगदा टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) खोदण्याचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. या जलबोगद्यांमुळे चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर, परळ, माटुंगा सायन आदी परिसरातील पाणीपुरवठ्यात २०२४ नंतर सुधारणा होणार आहे. 

अमर महल ते ट्रॉम्बे निमनस्तर जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतच्या जलबोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत हेगडेवार उद्यान, आरसीएफ आणि अणुशक्ती नगर येथे ८१ मीटर ते ११० मीटर इतक्या खोलीची तीन कुपक बांधण्यात येत आहेत. तर अमर महल ते प्रतिक्षा नगर आणि पुढे परळपर्यंतच्या जलबोगद्यामुळे सायन, माटुंगा, परळ, एलफिस्टन या भागांमध्ये तसेच कुर्ला व भायखळा या भागातील पाणीपुरवठा अंशतः सुधारणा होणार आहे.

२०६१ पर्यंतच्या वाढीव पाणीपुरवठ्याची क्षमता

या जलबोगद्यासाठी सल्लागार मे. टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स लि. आणि ठेकेदार मे. पटेल इंजिनिअरिंग लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांधकामाचा कालावधी ७२ महिन्यांचा असून २०२४ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या जलबोगद्यामुळे एम पूर्व, एम पश्चिम विभागाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार असून २०६१ पर्यंतचा वाढीव पाणीपुरवठा हाताळण्याची क्षमता या बोगद्यामध्ये असणार आहे. 

या भागांना दिलासा

या दोन जलबोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर, परळ, माटुंगा, सायन येथील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. तर कुर्ला, भायखळा परिसरातील पाणीपुरवठ्यात अंशतः सुधारणा होणार आहे. महापालिकेने आतापर्यंत ८६ कि.मी. लांबीचे जलबोगदे बांधले आहेत. या दोन जलबोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर जलबोगद्यांच्या लांबीचे शतक पूर्ण होणार आहे.

 

टॅग्स :मुंबईपाणी