मुंबई : मुंबईप्रमाणे पुणे आणि नागपूर विमानतळांवरही प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर, सध्या २५ जण रुग्णालयात निरीक्षणाखाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले.केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व करोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५१६ प्रवासी आले आहेत.ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत २२९ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा पुण्यातील प्रयोगशाळेने दिले. तर, उर्वरित २५ जणांचे अहवाल लवकरच मिळणार आहेत.आजवर भरती झालेल्या २२९ प्रवाशांपैकी २०४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबईत १६ जण तर नाशिक येथे ३ जण, पुणे येथे ४ जण तर नांदेड, सांगली येथे प्रत्येकी १ जण भरती आहेत.