Join us

ओएलएक्सच्या आधारे दुचाकी चोरणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:20 PM

ओएलएक्सवर वाहन खरेदीच्या बहाण्याने दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला सायन पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : ओएलएक्सवर वाहन खरेदीच्या बहाण्याने दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला सायन पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य साळवी (२८) असे आरोपीचे नाव आहे. चोरी केलेली वाहने तो पुन्हा ओएलएक्सवरच विकत असल्याचेही तपासात समोर आले. हिरे कंपनीत दलाल असलेले अंकित मेहता (४०) हे सायन परिसरात राहतात. १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता त्यांच्याजवळील यामाहा आर १५ ही दुचाकी ओएलएक्स विक्रीसाठी फोटोसह त्यांनी नोंद केली.दुसऱ्या दिवशी आदित्यने रिक्षामध्ये प्रवास करीत असताना चालकाच्या मोबाइल फोनमधून हातचलखीने सिम कार्ड काढून घेतले. त्या सिम कार्डमधून सकाळी ११ वा. आदित्यने मेहता यांचे वाहन घेण्याची इच्छा दर्शविली. त्यानुसार दुसºया दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता सायन कोळीवाड्यातील एका बँकेजवळील हनुमान मंदिराजवळ भेटण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे त्यांची भेट झाली. आरोपीने अंकितजवळ गाडीची कागदपत्रे मागितली, कागदपत्रे तपासून त्याला या दुचाकीची टेस्ट ड्राइव्ह मागितली. पुढे गाडी चालवत असताना अंकित त्याच्या मागे बसला. पुढे धारावी ब्रिजच्या दिशेने निघाले असता सायन रुग्णालयाच्या गेट क्रमांक ७ येथे इंजिनमधून आवाज येतो म्हणून आदित्यने अंकितला उतरवले. त्यानंतर वाहन चालवून थोडा पुढे जात आदित्यने दुचाकीसह पळ काढला. अंकितने याची पोलिसांत तक्रार केली़ तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. याबाबत आरोपीला कुणकुण लागताच त्याने एका टेम्पोमधून ती दुचाकी अंकितच्या पत्त्यावर कागद पत्रासह पाठविली.अशाच प्रकारचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत घडला होता. त्यानुसार त्यांनी सापळा रचून आदित्यला अटक केली. याबाबत सायन पोलिसांना आरोपीचा ताबा मिळताच, त्याच्या चौकशीत वरील घटनाक्रम उघडकीस आला. पुढे त्याने बीकेसी, चिपळूण, पनवेल, कराड, खांदेश्वर येथून अशा प्रकारे वाहन चोरी करून ओएलएक्सवर विक्री केल्याची कबुली दिली. त्याने आणखी गुन्हे केल्याची शक्यता असल्याने अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर करीत आहे.