लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
ग्रँटरोड येथील लॅम्गिंटन रोड येथील त्रिभुवन गल्लीमध्ये नुकतेच मॅक्स नावाच्या श्वानाच्या पायावरून दुचाकी नेण्यासह त्याला लाथ मारण्यात आल्याची घटना घडली. मॅक्स रस्त्याच्या कडेला बसलेला असताना डिमलँड सिनेमाकडून दुचाकीवर दोन जण घटनास्थळी आले. त्यांनी मॅक्सच्या पायावरून गाडी नेली. शिवाय त्याला लाथ मारून पुढेदेखील गेले. घटना घडली त्या परिसरात अनेक जण असूनदेखील कोणीच त्यांना हटकले नाही. येथे घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून, या मदतीने पोलिसांनी संबंधितांचा माग काढावा, अशी मागणी नमोनम: बहुद्देशीय संस्थेने केली आहे.
या घटनेनंतर मॅक्स बरा असला तरीदेखील अशा घटनांना आळा बसावा याकरिता यंत्रणेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. कारण यापूर्वीही भर दिवसा अशा घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे श्वानांना जबर इजा झाली आहे, तर अनेक रस्ते एक दिशा असून, दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांकडून येथील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, अशी माहितीदेखील संस्थेकडून देण्यात आली.