चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपुलावर दुचाकी, रिक्षांना बंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 03:31 AM2019-11-13T03:31:42+5:302019-11-13T03:32:11+5:30
चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मुंबई : चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उड्डाणपुलावरून दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांमध्ये नाराजी आहे़ रिक्षा संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पूर्ण काम होऊनदेखील चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल खुला करण्यात येत नव्हता. राष्ट्रवादीने या ठिकाणी आंदोलन करत हा मार्ग तत्काळ खुला करण्याची मागणी केली होती. काही दिवसांचा वेळ घेत १० नोव्हेंबरपासून एमएमआरडीएने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होऊ शकते, अपघात घडू शकतात, असे सांगत वाहतूक पोलीस आणि एमएमआरडीएने या मार्गावरून दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तशा प्रकारचे फलक एमएमआरडीएने या पुलाच्या प्रवेशद्वारावर लावले आहेत. या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाचत असल्याने रिक्षा आणि दुचाकींना येथून प्रवेश मिळावा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. याबाबत बीकेसी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील यादव म्हणाले, वाहतूककोंडी कमी व्हावी यासाठी हा उड्डाणपूल बांधला आहे, पण दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होऊ शकत़े़ या कारणास्तव एमएमआरडीएने बंदी घातली असेल. दुचाकी व रिक्षा यांना उड्डाणपुलावर परवानगी नाकारणे हा अन्याय आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होते; परंतु दुचाकी व रिक्षा यांचा वाहतुकीवर कोणताच परिणाम होत नाही. अवजड वाहनांवरील बंदी कायम ठेवून दुचाकी व रिक्षा यांना उड्डाणपुलावर प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी दुचाकी चालक मुश्ताक अन्सारी यांनी केली आहे.
>आंदोलन करणार
चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपुलावर दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांना बंदी घालणे चुकीचे आहे. या भागात प्रवास करणाऱ्यांना रिक्षाने प्रवास करून कमी वेळेत पोहोचता येईल. याबाबत वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बंदी हटविण्याची मागणी करणार आहोत. तरीही बंदी न हटविल्यास आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमान टॅक्सी आॅटो युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले.