दुचाकींवरील टोल तुर्तास बंद, देशातील एकमेव टोलनाका; शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:39 AM2017-11-24T01:39:16+5:302017-11-24T01:51:52+5:30
मुंबई : दुचाकीस्वारांकडूनही टोल वसूल करणाºया रे रोड येथील देशातील एकमेव टोल नाक्यावर शिवसैनिकांनी बुधवारी सकाळी धडक दिली.
मुंबई : दुचाकीस्वारांकडूनही टोल वसूल करणा-या रे रोड येथील देशातील एकमेव टोल नाक्यावर शिवसैनिकांनी बुधवारी सकाळी धडक दिली. या आंदोलनानंतर तुर्तास दुचाकीस्वारांकडून टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती टोल कंत्राटदार कंपनीचे संचालक राजकुमार ढाकणे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अख्यारित असलेल्या रे रोड येथील रस्त्यावर पुण्याच्या डी. आर. सर्व्हिसेस या टोल कंपनीकडून चारचाकी वाहन चालक तसेच दुचाकीस्वारांकडूनही सर्रास टोल आकारण्यात येत होता. देशात कोणत्याही टोलनाक्यावर दुचाकीस्वारांकडून टोलवसुली होत नसल्याने ही वसुली अन्यायकारक असल्याचा दावा करत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांची भेट घेतली होती. त्यावेळी लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा शिवसेनेने केला होता. मात्र चार दिवसांत कोणताही निर्णय जाहीर न झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी बुधवारी सकाळी टोलनाक्यावर आंदोलन सुरू केले.
दुचाकीस्वारांकडून वसूल होणारा टोल बंद केला नाही, तर संपूर्ण टोलनाकाच बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ, नगरसेवक सचिन पडवळ आणि नगरसेवक आशिष चेंबूरकर हेदेखील आंदोलनात सहभागी झाले होते.
राजकीय पक्षांच्या निवेदनामुळे तुर्तास काही दिवसांसाठी आम्ही दुचाकीस्वारांकडून टोल वसुली बंद केली आहे. मात्र मुंबई पोर्ट ट्रस्टसोबत केलेल्या करारात दुचाकीवर २० रुपये टोल आकारण्याची तरतूद आहे. असे असताना दुचाकीमागे १० रुपये टोल आकारला जातो. स्थानिक दुचाकीस्वारांना टोलमधून सूट देण्याचा विचार करू शकतो. मात्र सर्व दुचाकींना टोलमाफी दिल्यास कंपनीचे नुकसान होईल. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आदेशविना दुचाकीला टोलमाफी देता येणार नाही.
- राजकुमार ढाकणे, संचालक, डी. आर. सर्व्हिसेस