Join us

वाहतूक शाखेच्या रडारवर दुचाकीस्वार

By admin | Published: January 20, 2015 1:19 AM

वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस नियमितपणे बेशिस्त वाहनांवर कारवाई करतात. कारवाईमध्ये सर्वाधिक लक्ष्य मोटारसायकलस्वारांना केले जात आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबईवाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस नियमितपणे बेशिस्त वाहनांवर कारवाई करतात. कारवाईमध्ये सर्वाधिक लक्ष्य मोटारसायकलस्वारांना केले जात आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून दररोज सरासरी १०० जणांवर कारवाई होत असल्याचे निदर्शनास आले असून पाच वर्षांत तब्बल १,८१,८१० जणांवर कारवाई करण्यात आली. नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम केले जात आहे. वाहतूक कोंडी सोडविणे. वाहतुकीस शिस्त लावणे. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलीस करत असतात. गत वर्षभरामध्ये तब्बल ३ लाख ४७ हजार ८३५ वाहनांवर कारवाई करून ३ कोटी ९२ लाख ३६ हजार रूपये दंड वसूल केला आहे. नो पार्किंग व रोड पार्किंगनंतर सर्वाधिक कारवाई हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर करण्यात आली आहे. वर्षभरामध्ये तब्बल ४६ हजार ९२९ दुचाकीस्वारांवर कारवाई केली असून गतवर्षीपेक्षा ही संख्या ९०६३ ने जास्त आहे. प्रत्येक वर्षी हेल्मेट न घालणाऱ्यांकडून ३० ते ५० लाख रूपये दंड वसूल केला जात आहे. यावरून मोटारसायकलस्वार पोलिसांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. अनेक अपघातांमध्ये हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काही वर्षांपूर्वी पामबीच रोडवर एका पोलीस कर्मचाऱ्याचाही मोटारसायकलवरून पडल्याने मृत्यू झाला होता. हेल्मेट घालणे आवश्यक आहे व पोलीस मोठ्याप्रमाणात कारवाई करत असतानाही हा नियम पायदळी तुडविला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामध्ये दुचाकीस्वारांच्यानिष्काळजीपणा व पोलिसांच्या चुकीच्या कारवाईचाही समावेश आहे. वाहतूक पोलीस शिस्त लावण्यासाठी कारवाई करण्याऐवजी कोटा पूर्ण करण्यासाठी कारवाई करत असल्याचे चित्र अनेक वेळा शहरात दिसत आहे. सकाळच्या सत्रात कारवाई केली जाते. महिनाअखेर, वर्षअखेरीस कारवाई वाढविली जाते. सिग्नलवर पोलीस न थांबता सिग्नलच्या थोडे पुढे थांबतात. महत्त्वाच्या चौकांमध्ये चोवीस तास पोलीस बंदोबस्त असला पाहिजे परंतु तसे होत नाही. च्हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक पोलीस नियमित कारवाई करत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र पोलीसच नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ७० टक्के पोलीस कर्मचारी हेल्मेटचा वापर करत नाहीत. कारवाई सुरू असलेल्या ठिकाणांवरूनही पोलीस बिनधास्त विनाहेल्मेट जात असल्याचे पहावयास मिळत आहे. च्पोलीस आयुक्त, उपआयुक्तांनी वारंवार परिपत्रक काढूनही पोलीस हेल्मेट घालत नाहीत. पहिल्यांदा पोलिसांनी स्वत: नियम पाळावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. या व्यतिरिक्त राजकारणी, पत्रकार व इतर महत्त्वाच्या व्यक्तीही सुरक्षेकडे दुर्लक्ष करून बिनधास्त नियम तोडतात.