लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : राज्यात काही ग्रामीण भागात प्रति तास २५ किलोमीटरहून अधिक वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणीच होत नसल्याचे समोर आले आहे. काही दुचाकी डीलर्सकडून चालकांची दिशाभूल करून नोंदणीची आवश्यकता नसल्याची माहिती दिली जात आहे. अशा डीलर्सवर कडक कारवाई करण्याचे संकेत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले.
राज्यात पुण्यासह काही ग्रामीण भागात प्रती तास ६० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणीशिवाय विक्री होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. दुचाकी विक्रेत्यांकडून ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकींच्या नोंदणीची गरज नसल्याचे कारण देण्यात येत आहे. मुळात २५ किलोमीटरहून अधिक वेगाने धावणाऱ्या प्रत्येक दुचाकीची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात करणे गरजेचे आहे. तसे शासन नियमात नमूद केलेले आहे. मात्र ग्राहकांची दिशाभूल करून काही डीलर्सने अधिक क्षमतेच्या व २५ किलोमीटर प्रति तासाहून अधिक वेगाने धावणऱ्या शेकडो इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केल्याची चर्चा आहे. संबंधित डीलर्सप्रमाणे राज्यातील विविध ग्रामीण भागात अशाप्रकारे दुचाकींची विक्री झाल्याची शक्यताही समोर आली आहे. त्याची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्त कार्यालयाने झाडाझडती घेण्याचे ठरवले आहे.