मुंबई : सप्टेंबरचा दुसरा आठवडा संपला तरीही साथीच्या रोगांमध्ये घट झालेली नाही. या महिन्यात स्वाइनमुळे एकाचा आणि डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ८ ते १४ दरम्यान स्वाइनचे ७९ आणि डेंग्यूचे ५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गोवंडी येथे राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. २२ आॅगस्ट रोजी या महिलेला उपचारासाठी हबीब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर २८ आॅगस्ट रोजी तिला कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे तिला २ सप्टेंबर रोजी नायर रुग्णालयात हलवण्यात आले. स्वाइनचे निदान झाल्यावर तिला पाच दिवसांचे औषध सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान ६ सप्टेंबर रोजी या महिलाचा मृत्यू झाला. लोअर परेल येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. ७ आॅगस्ट रोजी या पुरुष रुग्णास कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हाच या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. त्याच्यावर त्वरित औषधोपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा १३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे ३४ रुग्ण आढळून आले होते. पण ८ ते १४ सप्टेंबरच्या कालावधीन डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. दुसऱ्या आठवड्यात स्वाइनचे रुग्ण जास्त आढळून आले आहेत. वाढलेले तापमान आणि मधेच पडणारा पाऊस, अशा वातावरणामुळे दमटपणा वाढलेला आहे. असा दमटपणा डासांच्या वाढीस पोषक असतो. यामुळे डासांची पैदास रोखण्यासाठी सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. या काळात फ्लू झालेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेतली पाहिजे. सतत बदलत्या वातावरणामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे. गणशोत्सवात घ्या विशेष काळजी जुलै महिन्यापासून मुंबईत स्वाइन फ्लूची साथ पसरली आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. ज्या व्यक्तीला स्वाइनची लागण झाली असेल त्याच्या थुंकीवाटे, शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबावाटे स्वाइनची लागण दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. गणेशोत्सवादरम्यान ठिकठिकाणी गर्दी असते. ज्यांना फ्लूची लक्षणे आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. -डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी
मुंबईत सात दिवसांत २ बळी
By admin | Published: September 16, 2015 3:15 AM