मुंबई : वर्सोवा विधानसभेच्या दोन महिला नगरसेविकांना महापालिकेच्या समितीमध्ये स्थान मिळणार आहे. शिवसेनेच्या फायरब्रँड महिला विभाग संघटक व प्रभाग क्र ६१च्या ४ वेळा निवडून आलेल्या नगरसेविका राजूल पटेल यांना पक्षाने मुंबई महापालिकेच्या ‘सार्वजनिक आरोग्य समिती’च्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच या विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र ५९च्या नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनादेखील पालिकेच्या ‘बाजार व उद्यान’ समितीच्या निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
या दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी वर्सोवा विधानसभेमधून दोन कर्तव्य दक्ष महिला नगरसेविकांना उमेदवारी दिल्याने २०२२च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजूल पटेल या ४ वेळा नगरसेविका म्हणून निवडून येऊन विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. तसेच त्यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे. शिवाय २०१९ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती त्यात त्यांनी ३२७०८ एवढी मते मिळवली होती. त्यामुळे त्यांना समिती मिळणे जरुरीचे होते अशी विभागातील शिवसैनिकांची भावना होती.
प्रभाग क्र ५९च्या नगरसेविका प्रतिमा खोपडे या प्रथमच निवडून आल्या त्यांनीदेखील कोविडच्या काळात केलेल्या कामाची दखल पक्षाने घेतली आणि त्यांना ‘उद्यान व बाजार समिती’च्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली. या दोन्ही नगरसेविकांनी आपापले अर्ज मंगळवारीच दाखल केले आहेत. येत्या शुक्रवारी ९ एप्रिल रोजी पार पडणाऱ्या या समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे बलाबल पाहता दोन्ही नगरसेविका नियोजित समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होतील असे चिन्ह दिसत असल्याने शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
------------------------------------------ -