- गौरी टेंबकर मुंबई - गोर गरिबांना पैसे वाटायचे आहेत असे सांगत पीठ विक्री करणाऱ्या कंपनीच्या दोन कामगारांना लुबडण्याचा प्रकार वाकोला पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
तक्रारदार संतोष शेघर (४०) हे साकीनाका परिसरात असलेल्या विविध पीठ विक्री करणाऱ्या कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतात तर दत्ता अडदाळे (४०) हे त्यांचे सहकारी आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांना सांताक्रुज पूर्वच्या यशवंत नगर परिसरात एक अनोळखी इसम भेटला. त्याने तुम्हारे शेठ का २२०० रुपये बाकी है वो तुम ले लो असे म्हणत अजून शंभर रुपये देत नाश्ता करना असे सांगितले. त्यानंतर त्याच्या घरी पूजा असल्याने त्याला ३५ किलो पीठ पाहिजे असे म्हणत तो आकाश बिल्डिंग परिसरात संतोषला घेऊन गेला. त्याने तिथे पिठाचे १३०० रुपये देत घरी पूजा असल्याने त्याला गोरगरिबांना ५०० रुपये वाटायचे आहेत. मात्र माझ्याकडे २०० च्या नोटा असल्याने तुमच्याकडे असलेल्या पाचशे रुपयांच्या ४० नोटा असे वीस हजार रुपये मला द्या. त्या बदल्यात मी तुम्हाला २०० च्या नोटा देतो असे सांगितले. संतोष यांनी नुकतीच एका ठिकाणी काही मालाची डिलिव्हरी केल्यामुळे त्याचे जमा झालेले पैसे त्यांच्याकडे होते. ते पैसे त्यांनी सदर इसमाला दिले. भामट्याने पीठ घेऊन आकाश इमारतीच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या ६०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये डिलिव्हरी कर सांगत तुझ्या सहकाऱ्याकडे मी पैसे देतो असेही म्हणाला. संतोषने विश्वास ठेवत पीठ घेऊन सहावा मजला गाठला मात्र त्याठिकाणी ६०१ क्रमांकाचा फ्लॅटच नसल्याचे त्याला सांगण्यात आले. तेव्हा त्यांना संशय आला नाही त्यांनी दत्ताला फोन केला आणि सदर इसमाकडून वीस हजार रुपये घेतलेस का अशी विचारणा केली. त्यावर त्या व्यक्तीने तुला बोलवण्यासाठी मलाही वर जिन्यावर पाठवले असून तू दिलेले २ हजार रुपयेही घेतल्याचे सांगितले. तेव्हा या दोघांनीही सदर अनोळखी व्यक्तीचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. अशाप्रकारे त्याने २२ हजारांचा गंडा घातला आणि या विरोधात वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला.