सैनिकांना राख्या देण्यासाठी २ हजार ५०० किमी प्रवास करून दोन युवक पोहचले श्रीनगरला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 06:46 PM2020-08-01T18:46:31+5:302020-08-01T18:47:04+5:30
बहिण भावाचे अतुट नाते...
मनोहर कुंभेजकर
मुंबई : श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला येणारा रक्षा बंधनाचा सण. बहिण भावाचे अतुट नाते जपणाऱ्या हा सण दरवर्षी देशात उत्साहात साजरा केला जातो.मात्र यंदा रक्षा बंधनावर कोरोनाचे सावट आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता,देशाच्या रक्षणासाठी आपले जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून तैनात असतात.यंदा कोरोनामुळे त्यांच्या पर्यंत बहिणींच्या राख्या पोहचू शकणार नाही.त्यामुळे देशभरातून गोळा केलेल्या 8000 राख्या मुंबईच्या जुहू मोरा कोळीवाडा येथील वैभव जगदीश मांगेला व डोंबिवलीचा रोहित वासुदेव आचरेकर हे दोन तरुण २ हजार ५०० किमीचा स्कुटीवरून प्रवास करून काल सकाळी 11 वाजता श्रीनगरला पोहचले.
वे टू कॉज संस्थेच्या एक बंधन मिशन कार्यक्रमा अंतर्गत देशभरातून गोळा केलेल्या 8000 राख्या ते सोमवार दि,3 रोजी देशातील विविध ठिकाणी असलेल्या जवानांना राख्या देण्यासाठी ते श्रीनगरच्या सीमेवर असलेल्या आपल्या जवानांकडे सुपूर्द करणार आहेत. तुम्ही आहात म्हणून आम्ही देशातील बहिणी या सुखरूप आहोत,आम्ही प्रेमाने दिलेल्या राख्या आपण राखी पौर्णिमेला परिधान करा. आमचे व देशाचे रक्षण करा असा संदेश याद्वारे आपल्या जवानांना देण्यात येणार असल्याची माहिती वैभव मांगेला यांनी लोकमतला दिली.
दि,22 जुलै वरून आम्ही दोघे मुंबई वरून निघालो,रोज सुमारे 400 ते 500 किमीचा प्रवास स्कुटीवरून करत होतो. मात्र जम्मू ते श्रीनगर रस्ता कच्चा असल्याने सदर 200 किमीचे अंतर पार करायला आम्हाला चक्क 11 तास लागले. प्रवासात ठिकठिकाणी आमचे उस्फूर्त स्वागत केले.तर रोटरी क्लब आणि अन्य संस्थाचे या दोन तरुणांना सहकार्य लाभले.सोशल मीडियावरून देखिल या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.