तैयब मेहतांच्या चित्राची तब्बल १७. २५ कोटींना विक्री, ऑनलाइन लिलावात विक्रमी किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 05:04 PM2017-08-31T17:04:51+5:302017-08-31T17:11:01+5:30
अॅस्टागुरु व्यासपीठाच्या माध्यमातून झालेल्या या लिलावात तैयब मेहता यांच्या चित्राला तब्बल १७ कोटी २५ लाख दोन हजार ५०० एवढी किंमत मिळाली आहे
मुंबई, दि. 31 - ऑनलाइन लिलावात तैयब मेहता यांच्या चित्राने विक्रमी किंमत मिळवत एक नवा इतिहास रचला आहे. अॅस्टागुरु व्यासपीठाच्या माध्यमातून झालेल्या या लिलावात तैयब मेहता यांच्या चित्राला तब्बल १७ कोटी २५ लाख दोन हजार ५०० एवढी किंमत मिळाली आहे . गेल्या आठवड्यात हा लिलाव करण्यात आला. यावेळी तैयब मेहता यांच्यासोबत व्ही . एस . गायतोंडे, मनजीत बावा, एस . एच . रजा यांच्याही चित्रकृतींच्या ऑनलाइन लिलावाचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे कोणत्याही भारतीय कलाकाराचे ऑनलाइन माध्यमातून लिलाव झालेले हे सर्वाधिक किमतीचे चित्र आहे. अदर पूनावाला यांनी या चित्राची सर्वाधिक बोली लावली. या व्यतिरिक्त या ऑनलाइन लिलावामध्ये तब्बल ६८ कोटी ३१ लाख, ३९ हजार ७४९ एवढ्या किमतीच्या चित्रांचा लिलाव झाला. कोलकात्याचे ज्येष्ठ कलाकार गणेश पाइन यांच्या 'द डोअर अँड द विंडोज ' या कलाकृतीलाही दोन कोटी ८३ लाख १७ हजार ८९७ एवढी किंमत मिळाली. पाइन यांचे चित्र विकत घेणा-यांचे नाव गुप्त राखण्यात आले आहे. हे चित्र पहिल्यांदाच अशाप्रकारे लिलावात ठेवण्यात आले होते. बंगाल आर्ट स्कूलचे नाव जगभरात पोहचवण्यामध्ये पाइन यांचा महत्वाचा सहभाग आहे. मेहता यांचे चित्र १९८४ सालचे असून ते तैलचित्र प्रकारातील आहे.
गणेश पाइन यांचे 'द डोअर अँड द विंडोज'
ऑनलाइन लिलावासाठी उपलब्ध केलेल्या चित्रांपैकी ९१ टक्के चित्रांचा लिलाव झाला. या लिलावासाठी ६८ कलाकृती उपलब्ध होत्या. इतर चित्रकारांच्या चित्रांनाही चांगली किंमत मिळाली आहे. यामध्ये जोगेन चौधरी यांचे 'स्टोरी ऑफ वूमन ' ही कलाकृती होती. ही त्यांची आतापर्यंतची सर्वांत मोठी कलाकृती आहे. ती पाच पॅनलच्या माध्यमातून उलगडली आहे. रझा यांचे १९५७ मधील पेझाझ कोर्स हे लॅंडस्केप या लिलावामध्ये होत. कृष्णन खन्ना यांची १९७८ मधील कलाकृती 'डाऊटिंग थॉमस विथ जिझस' हि सुद्धा कलाकृती लिलावासाठी उपलब्ध होती.